लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल काॅलेजच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पिंपरी, पुणे (दि. ३१ मार्च २०२४) असाध्य अशा कर्करोगावर जगभरात विविध उपचार पद्धतींनी औषधोपचार केले जात असून खात्रीशीर इलाजासाठी प्रयोगशाळांमधून संशोधक नवनवीन संशोधन करीत आहेत. कर्करोग रूग्णांवर होमिओपॅथीव्दारे औषधोपचार गुणकारी ठरतात हे सिध्द झाले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजकुमार पाटील यांनी केले.
चिंचवड येथील स्व. फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशन, लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल काॅलेजच्या वतीने ‘होमिओपॅथी व्दारे कर्करोगावर उपचार’ या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ होमिओपॅथी डॉ. कटेकरी, डॉ. धर्मेंद्र शर्मा, डॉ. आर. एस. गुंजाळ, डॉ. मनिषा सोलंकी, डॉ. अरुण जाधव, डॉ कमलेश घोलप, डॉ जयकुमार भानुसे, डॉ. राहुल फेरवानी, परिषदेचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. श्रीकांत तलारी, डॉ. राजन शंकरन, फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त निहाल पानसरे, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. झोया पानसरे, विश्वस्त डॉ. श्याम अहिरराव, प्राचार्या डॉ. नंदिनी जोशी, संयोजिका डॉ. विद्या इंडी, डॉ. समीर बोडस, डॉ. सोनाली मोहरील, डॉ शिशिर परांजपे, डॉ जानकी दोशी, डॉ. कविता पाटील व संस्थेचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
होमिओपॅथी औषधांव्दारे कर्करोग रूग्णांवर प्रभावी उपचार करता येतात. या उपचारांमुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आजाराचे योग्य निदान, रूग्णांची शारीरिक, मानसिक परिस्थिती औषधांची योग्य निवड करून उपचार केले तर रूग्ण लवकर बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत तलारी यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात डॉ. राजन शंकरन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. होमिओपॅथी उपचार पध्दती प्रभावी आहे. विशेषतः असाध्य रोगांवर होमिओपॅथी औषधे गुणकारी ठरतात. या औषधोपचारांनी रूग्ण कर्करोगावर पूर्णपणे मात करू शकतो, असे डॉ. शंकरन यांनी सांगितले. त्यांनी काही चित्रफित द्वारे मार्गदर्शन केले.
स्वागत डॉ. नंदिनी जोशी, सूत्रसंचालन डॉ. उल्का ठाकूर व डॉ. समीर बोडस यांनी तर डॉ. आरती खळदकर यांनी आभार मानले. परिषदेस महाराष्ट्रासह देशभरातून विद्यार्थी, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.