; आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित प्रवचनाचा चौथा दिवस
पुणे : आपल्या शरीरात पाच ज्ञानेंद्रिये आहेत. त्यामध्ये इंद्रिये, त्याचा विषय आणि प्रवृत्ती हे तीन भाग आहेत. कान, डोळे, नाक, जीभ, स्पर्श या इंद्रियांचे विषय आणि प्रवृत्ती वेगवेगळे आहेत. इंद्रियांमधून आपण ज्ञान ग्रहण करू शकतो आणि विषयाचा बोध देखील मिळवू शकतो. कान आणि डोळे हे दोन कामी इंद्रिये आणि नाक, जीभ, स्पर्श हे तीन भोगी इंद्रिये आहेत. प्रत्यक्षात कान व डोळे ही दोन मोठी इंद्रिये ज्ञानप्राप्तीची प्रमुख माध्यमे आहेत, त्यांचा उपयोग ज्ञानप्राप्ती करिता अधिकाधिक व्हायला हवा, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु आहे. त्याच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ उद्योजक फत्तेचंद रांका, राजेंद्र बांठिया, माजी नगरसेवक प्रविण चोरबेले, ऍड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, राजकारणात आध्यात्मिकता गरजेची आहे. राजकारणात आध्यात्म असेल, तर देशात चांगले राजकारण होउ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अध्यात्माची जोड देत सर्व कार्य करीत आहेत. आम्हाला देखील अध्यात्मातून चांगले राजकारण करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, तरुणाईमध्ये नशेचे प्रमाण अधिक वाढत आहे. पूर्वीच्या काळात या गोष्टीचे प्रमाण कमी होते. पुण्यात नशेचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे आजच्या पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी आपण कार्य करीत असलेल्या एकता व धर्माच्या कार्याप्रमाणेच नशामुक्तीचे कार्य व्हावे. ‘ड्रग मुक्त महाराष्ट्र’ हे अभियान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविले जात आहे, त्यात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री महाश्रमणजी म्हणाले, माणूस कानाद्वारे ऐकून मोठ्या प्रमाणात ज्ञान ग्रहण करतो. आजच्या काळात ऑनलाईन माध्यमाद्वारे हजारो मैल अंतरावरून देखील ज्ञान प्राप्त केले जाते. हजारो वर्षांपूर्वी गुरूकडून मिळणारे ज्ञान ऐकून म्हणजेच श्रोतृ इंद्रियांद्वारे शिष्य शिक्षण घेत असत. डोळ्याद्वारे पुस्तके वाचून देखील मोठया प्रमाणात ज्ञान प्राप्त केले जाते.
ते पुढे म्हणाले, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये कान व डोळे ही ज्ञानसंपादनाची दोन सक्षम माध्यमे आहेत. शब्दाचा अर्थ माहीत आहे की नाही, हे महत्वाचे आहे. शब्दांचा अर्थ समजला तरच आपण ज्ञान मिळवू शकतो. भाषेच्या क्षेत्रात व्याकरणाचे ज्ञान नसेल, तर सगळेच व्यर्थ आहे. व्याकरणाचे ज्ञान नसेल तर याक्षेत्रात ती व्यक्ती दृष्टीहीन म्हणून ओळखली जाईल. आभूषणे आपण किती घालतो, हे महत्वाचे नाही. तर, सद्गुणांचे आभूषण सगळ्यांकडे असायला हवे. इंद्रियांचा दुरुपयोग न करता चांगला वापर केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक २ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती आयोजनात सहभागी झाले आहे.