शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच अमोल कोल्हे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नसोहळ्यास हजेरी लावली.
या विवाह सोहळ्यातही खासदार कोल्हे यांनी तुतारीचा प्रचार करण्याची संधी मात्र सोडली नाही. विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यास उशीर झाल्यामुळे कोल्हे यांनी “घड्याळ निघून गेल्यामुळे वेळ जुळेना” पण “वधूवरांच्या आयुष्यात सुखाची, समाधानाची तुतारी वाजावी” अशा मिश्किल शब्दांत शुभेच्छा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या राजकीय टोलेबाजीने दिलीप मोहिते पाटलांनाही हसू आवरता आले नाही.
तसेच यावेळी अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते यांच्या पत्नीचे चरण स्पर्श केले. आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला की मी तो अप्रत्यक्षपणे आमदार दिलीप मोहितेंनी मला खासदारकीसाठी आशीर्वाद दिला असं समजतो अशी प्रतिक्रिया दिली. अमोल कोल्हेंच्या या कोपरखळीने पुन्हा एकदा हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.