पुणे, ता.3 – नर्सिंग व्यवसायात परिचारिका घेत असलेल्या रूग्णांच्या वैयक्तिक काळजीची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही, असे मत जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांनी व्यक्त केले.
डीईएस सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगचा सोळावा लॅम्प लायटिंग समारंभ महापालिकेच्या वैद्यकीय उपाधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांच्या हस्ते संपन्न झाला. जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्या शारदा चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती होती.
सोनाली गोरे, शीतल ठाकूर, महिमा मेश्रामकर, स्नेहल बदक, आसिफ शेख, प्रथमेश आंबुरे या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
रुग्ण आणि नर्स यांच्यामध्ये निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते, असे मत डॉ. बलिवंत यांनी व्यक्त केले.
नर्सिंग व्यवसायाची तुलना अन्य कोणत्याही व्यवसायाशी होऊ शकत नाही. या व्यवसायात अर्थाजन होतेच, सेवाभावामुळे आत्मीक समाधान मिळते असे रावत यांनीसांगितले.