मुंबई.दि.१०: केरळमध्ये नवनिर्वाचित काँग्रेस महिला आमदार यांना पक्षातील ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी सार्वजनिक ठिकाणी, पक्षाच्या कार्यालयात मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय, असंस्कृतिक आणि महिलांच्या व्यक्तिगत सीमांचा स्पष्ट भंग करणारा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “एका महिला आमदाराला, तिने स्पष्ट नकार दिला असताना, हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असताना देखील जबरदस्तीने गळ्यात हात टाकून जवळ ओढण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अनैतिक नाही तर राजकीय क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेच्या आणि प्रतिष्ठेच्या प्रश्नावर गंभीर आघात आहे. भर रस्त्यात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात महिलांना अशा प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, तिच्या अस्वस्थतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हे पुरुषसत्ताक मानसिकतेचे द्योतक आहे. हे चित्रण केरळ काँग्रेसच्या कार्यालयात झाले, जिथे इतर नेते आणि माध्यमे उपस्थित होती, तरीही कोणाला हस्तक्षेप करण्याची गरज वाटली नाही . दोषी व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे.
कॅांग्रेसचे नमो शक्ती वंदन विधेयक विरोधाचा बुरखा केरळच्या घटनेने फाडला आहे.बुंदसे गई वो हैदोस नहीं आती हे कॅांग्रेसने लक्षात ठेवावे व महिलांनीही कॅांग्रेसचा भेसूर लक्षात ठेवावा.
महिलांना समान आदराने वागवा, त्यांच्या सीमांचा आदर करा. हे केवळ कायद्याचे पालन करणे उपयोगाचे नाही तर ही सर्वांचीच नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे असेही डॅा. नीलम गोर्हे म्हणाल्या.

