‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड थीमपार्क मध्ये झाले.‘चांदवा’ या नव्या अल्बमला आघाडीचा तरुण गायक स्वप्नील बांदोडकर आणि प्रथमच व्यावसायिक गायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या श्रेया भारतीय यांचा स्वरसाज लाभला आहे. संतोष मिजगर आणि प्रणाली मेने हे कलाकार या अल्बम मध्ये दिसणार आहेत.
विशेष म्हणजे ‘चांदवा’अल्बमचे निर्माते संतोष मिजगर यांनी चित्रनगरी मधील बॉलीवूड थीमपार्क सर्वसामान्यांसाठी खुलं केलं आहे. ‘पाहिलेल्या स्वप्नांचा ध्यास घेता यायला हवा, असं सांगताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अल्बमचे निर्माते संतोष मिजगर यांचं भरभरून कौतुक केलं’. प्रेमाच्या उर्मीची जाणीव करून देणारं हे गाणं गाताना खूपच समाधान लाभल्याची भावना गायक स्वप्नील बांदोडकरने व्यक्त केली. स्वप्नील सारख्या कसलेल्या दिग्ग्ज गायकासोबाबत पहिलं व्यावसायिक गीत गाण्याची संधी मिळाल्याचा आनंद गायिका श्रेया भारतीय यांनी व्यक्त केला. एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम आणि मिळणारी साथ खूप महत्त्वाची असते हे सांगू पाहणारं हे गाणं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वास ‘चांदवा’ अल्बमचे निर्माते, अभिनेते संतोष राममीना मिजगर यांनी व्यक्त केला.याप्रसंगीबॉलीवूड थीम पार्कचे टीम चें चिराग शाह ,रवी रुपरेलिया, संतोष वाईकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘आज वाटे मला जन्म झाला नवा I तुला पाहता मनी चांदवा’ I असे बोल असणाऱ्या या गाण्यातून एका जोडप्याचा निस्सिम प्रेमाचा प्रवास दाखविण्यात आला आहे. या गाण्यातून संतोष आणि प्रणाली या जोडीने प्रेमामागाची उत्कटता व त्यातील भावनेची खोली याचा सुरेख मेळ साधला आहे. दया होलंबे यांनी शब्दबद्ध केलेल्या गीताला संगीत देण्याची जबाबदारी डी. एच हार्मनी, एस.आर.एम एलियन यांनी सांभाळली आहे. झी म्युझिकने हे गाणं वितरीत केलं आहे.