मुंबई : एशिया सोसायटी इंडिया सेंटर बोर्डाने संगीता जिंदाल यांची बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा कार्यकाळ १ एप्रिल २०२४ पासून सुरू होत आहे. “एशिया सोसायटी इंडिया सेंटर बोर्डाच्या अध्यक्षपदी संगीता जिंदाल यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. दक्षिण आशियातील आमच्या कार्याला त्यांचा मोठा पाठिंबा आहे आणि भारत आणि दक्षिण आशियातील समकालीन कलेला समर्थन देण्यासाठीचे त्यांचे काम ही एक परिवर्तनकारी शक्ती आहे. दक्षिण आशियामध्ये एशिया सोसायटीचा ठसा मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे एशिया सोसायटी इंडिया सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इनाक्षी सोबती म्हणाल्या.
संगीता जिंदाल या आर्ट इंडियाच्या आणि JSW फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. JSW ग्रुप ऑफ कंपनीजच्या सामाजिक विकास प्रकल्पांसाठी JSW फाउंडेशन कारणीभूत आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचच्या त्यांच्या २० वर्षांच्या नेतृत्व काळात शिक्षण, आरोग्य, उपजीविका निर्मिती, स्थानिक क्रीडा विकास आणि कला आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या क्षेत्रांत फाउंडेशनने आपल्या उपक्रमांची व्याप्ती वाढवली आहे. त्यांनी १९९२ मध्ये जिंदाल आर्ट्स सेंटरची स्थापना केली आणि १९९४ मध्ये आर्ट इंडिया या भारतातील प्रमुख कला मासिकाचा पाया रचला. काळा घोडा कला महोत्सवाची संकल्पना मांडणाऱ्या टीममध्ये त्या होत्या आणि २००४ मध्ये त्यांना आयझेनहॉवर फेलोशिप देण्यात आली. त्यांनी हंपी फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनने हम्पी येथील तीन मंदिरांमध्ये संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. त्या एशिया सोसायटीच्या जागतिक विश्वस्त आणि राष्ट्रीय संस्कृती निधी मंडळाच्या सदस्य आहेत. जागतिक स्मारक निधी विश्वस्त, TEDxGateway च्या सल्लागार आणि IMC लेडीज विंग आर्ट, कल्चर आणि फिल्म कमिटीच्या सदस्य आहेत.
जॉन डी. रॉकफेलर ३ रे यांनी १९५६ मध्ये स्थापन केलेली, एशिया सोसायटी ही एक निष्पक्ष, ना नफा तत्वावर चालणारी संस्था असून न्यूयॉर्क, ह्यूस्टन आणि हाँगकाँग येथे प्रमुख केंद्रे आणि सार्वजनिक इमारती आहेत. लॉस एंजेलिस, मनिला, मेलबर्न, मुंबई, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल, सेऊल, सिडनी, टोकियो, वॉशिंग्टन डीसी आणि झुरिच येथे कार्यालये आहेत. इंडिया सेंटरची स्थापना २००६ मध्ये झाली. हे दक्षिण आशियातील एकमेव आशिया सोसायटी केंद्र असून आधुनिक आशियावरील विविध दृष्टीकोनांना एकत्र आणण्यासाठी आणि आशिया पॅसिफिक प्रकरणांची सूक्ष्म समज विकसित करण्याच्या उद्देशाने संपूर्ण उपखंडाचा समावेश करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. एशिया सोसायटी इंडियाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी asiasociety.org/india वर भेट द्या.