पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा-दीपक सिंगला
पुणे, दि. ३ : पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापाल, नवोदीत मतदार आणि नागरिकांनी १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदान करून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांनी केले.
निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पिंपरी चिंचवड शाखेत आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, समन्वयक अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आयसीएआय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटणी, उपाध्यक्ष वैभव मोदी यांच्यासह प्रक्षिक्षणार्थी सनदी लेखापाल उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात सहभाग घेवून सर्व सनदी लेखापाल, प्रशिक्षणार्थी यांनी स्वत: मतदान करण्यासोबत इतरांनाही प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री.सिंगला यांनी केले. संस्थेतील यंदा प्रथमच मतदान करणाऱ्या नवोदीत मतदारांचे त्यांनी अभिनंदन केले.
मतदान हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत हक्क असून सर्व सनदी लेखापाल तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या नवोदित विद्यार्थ्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन श्री.पाटणी यांनी केले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील प्रशिक्षणार्थी सनदी लेखापालांनी निवडणूकीत मतदान करण्याची शपथ घेतली.