पुणे: “सर्व प्रकारच्या वास्तु या प्रदर्शनामुळे एकाच मंचावर उपलबद्ध झाल्याने ग्राहकांना वास्तु निवडण्यास सोपे होईल. तसेच अधिकृत बांधकाम व्यावसायिकांकडून वास्तु घेणे हे केव्हाही हिताचेच आहे व क्रेडाई सारख्या अधिकृत संघटनेने या प्रदर्शनाचे आयोजन केल्यामुळे ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. ” असे मत प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी उदघटनाच्या वेळी व्यक्त केले.
क्रेडाई पुणे – मेट्रोचे पुण्यातील पश्चिम विभागीय वास्तु प्रदर्शनाचे ऑंर्कीड हॉटेल, बालेवाडी येथे प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. ‘आदित्य बिल्डर्स’ , ‘बी. यु. भंडारी लॅण्डमार्क्स’, ‘फरांदे प्रोमोटर्स अॅण्ड बिल्डर्स’, ‘अमित ऋजुता व्हेनच्युअर्स’, ‘गोयल गंगा कंस्ट्रक्शन्स’ अशा ९० हून अधिक बांधकाम व्यावसायिक, ५०० हून अधिक वास्तू आणि देशातील अग्रेसर बँकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. आजच्या ट्रेंडला साजेल असे हे प्रदर्शन असल्याने, वास्तू घेण्यासाठी किंवा पैशांची गुंतवणूक करण्यासाठी ही मोठी संधी येथे उपलब्ध झाली आहे. १७ व १८ ऑक्टोबर असे दोन दिवस सुरु असणाऱ्या या प्रदर्शनात सदनिका, प्लॉट्स, शॉप्स आणि बंगलोज अशा विस्तृत पर्यायामधून ग्राहक आपल्यासाठी योग्य वास्तू निवडू शकणार आहेत.
“आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते परंतु आपण नेमके कुठे व कशी गुंतवणूक करावी हे अनेकांच्या ध्यानात येत नाही. आज ग्राहकांसाठी या प्रदर्शना मार्फत अनेक मोठे पर्याय उपलब्ध झाले आहेत. तसेच या प्रदर्शनामध्ये वास्तूंवर व्याजाच्या तसेच इतर सवलती असल्यामुळे ग्राहकांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा.” असे मत क्रेडाई पुणे- मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल फरांदे यांनी व्यक्त केले.