जीबी एका दिवसात का गुंडाळता? आम्हाला बोलू देत नाही, अधिकाऱ्यांकडूनही प्रतिसाद नाही; १२६ नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत नाराजी उघड
पुणे : पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असूनही स्वतःच्या प्रभागातील विकासकामे मार्गी लागत नसल्याची नाराजी पक्षाच्या नगरसेवकांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपच्या १२६ नगरसेवकांना आपापल्या तक्रारी आणि अडचणी मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी विकासकामे, अधिकाऱ्यांचे सहकार्य, सर्वसाधारण सभेतील बोलण्याची संधी, हद्दवाढ भागातील प्रश्न आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव अशा अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.बैठकीत अनेक नगरसेवकांनी अक्षरशः आपापल्या प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचला. “पालिकेत आपली सत्ता असूनही आमच्या भागातील विकासकामे का मार्गी लागत नाहीत?” असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केल्याची माहिती आहे.
“मुख्य सभा एका दिवसात का गुंडाळली जाते?”
सर्वसाधारण सभेच्या कामकाजाबाबतही बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यापूर्वी जीबी तीन-चार दिवस चालत असे आणि बहुतांश नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळत असे; मात्र सध्याच्या कार्यकाळात सभा एका दिवसात संपवली जाते आणि अनेक नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली.
“पालिका अधिकारी आमचे ऐकत नाहीत”
भाजपच्या एका महिला नगरसेविकेने महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत “पालिका अधिकारी आमचे ऐकत नाहीत” अशी तक्रार केली.
एका ज्येष्ठ नगरसेवकाने सभागृह नेत्यांना उद्देशून, “तुम्ही काही ठराविक अधिकाऱ्यांच्या डोक्यावरचा हात एकदा काढून बघा; मग ते आमची कामे कशी करत नाहीत ते आम्ही पाहतो,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समजते आहे.
हद्दवाढ भागातील DP रोड, करमाफीचे प्रश्न
हद्दवाढ झालेल्या भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनीही बैठकीत आपले प्रश्न आक्रमकपणे मांडले. DP रोड, पायाभूत सुविधा तसेच करमाफीसंबंधीचे प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत या भागांना पुरेसा न्याय मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये मूलभूत सुविधा आणि विकासकामांना गती देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
भाजपच्या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांतील समन्वयावर प्रश्न
महापालिकेत भाजपची स्पष्ट सत्ता असतानाही नगरसेवकांच्या तक्रारी वाढण्यामागे सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि महापौर यांच्यात अपेक्षित समन्वय नसल्याची भावना काही नगरसेवकांमध्ये असल्याचे बैठकीतील चर्चेतून दिसून आले.विकासकामांपासून तेमुख्य सभेतील सहभागापर्यंत अनेक बाबतीत नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
बैठकीचा मुख्य उद्देश नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाढलेली धुसफूस कमी करणे हा होता. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला मनातील तक्रारी, अडचणी आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडण्यास सांगण्यात आले.
मोहोळ यांनी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.एकंदरीत, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी विकासकामे, अधिकारी-पदाधिकारी समन्वय आणि सर्वसाधारण सभेतील सहभागाच्या मुद्द्यावर पक्षातील नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी या बैठकीत उघडपणे समोर आली. आता या बैठकीनंतर पक्ष नेतृत्व आणि महापालिकेतील पदाधिकारी या तक्रारींवर नेमके काय पाऊल उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.

