नाव नोंदणी, वगळणे आणि तपशील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी
पुणे : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीवरील दावे आणि हरकतींच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत. ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे तसेच मतदार तपशीलातील दुरुस्तीसाठी २१ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, फॉर्म ६ चे १२ हजार ४७२ अर्ज, फॉर्म ७ चे ६८१ अर्ज आणि फॉर्म ८ चे ८ हजार ३६८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
मतदार यादीत नवीन नाव नोंदविणे, एखादे नाव वगळण्याबाबत हरकत घेणे तसेच नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
नवीन मतदार म्हणून नोंदणीसाठी फॉर्म ६, नाव वगळण्यासाठी किंवा हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७, तर नाव, पत्ता किंवा अन्य तपशील दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरावा लागणार आहे.
नागरिकांना ही प्रक्रिया ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येईल. ऑनलाइन अर्जासाठी निवडणूक आयोगाच्या voters.eci.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येतील.
पात्र नागरिकांनी मतदार यादी तपासून नाव नसल्यास किंवा तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

