मराठीसह सात भारतीय वधू-परंपरांसाठी लग्नातील विविध सोहळ्यांनुसार दागिन्यांचे स्वतंत्र संच
मुंबई : तनिष्कच्या लग्नाच्या दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘रिवाह बाय तनिष्क’ या उपब्रँडने ‘वेडिंग सिग्नेचर्स’ हा नवा संग्रह सादर केला आहे. तमिळ, तेलुगू, बिहारी, राजस्थानी/मारवाडी, गुजराती, मराठी तसेच महानगरांतील आधुनिक वधू अशा सात वेगवेगळ्या भारतीय वधू-परंपरांसाठी या संग्रहात संपूर्ण दागिन्यांचे संच तयार करण्यात आले आहेत.
आजची वधू सांस्कृतिक परंपरांशी जोडलेली असतानाच आपल्या लग्नाला स्वतःची स्वतंत्र ओळख देण्याला प्राधान्य देत आहे. लग्नाचे ठिकाण, विविध समारंभ, पेहराव, छायाचित्रण आणि सजावटीप्रमाणे प्रत्येक प्रसंगासाठी वेगळे दागिने निवडण्याकडे वधूंचा कल वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा संग्रह साकारण्यात आला आहे.
मराठी वधूसाठी वाटी मंगळसूत्र, तुशी हार
‘वेडिंग सिग्नेचर्स’मधील प्रत्येक संच संबंधित प्रदेशाच्या पारंपरिक दागिन्यांच्या शैलीनुसार तयार करण्यात आला आहे. मराठी संचात वाटी मंगळसूत्र, तुशी हार आणि वज्र टीक चोकर यांचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थानी/मारवाडी संचात बोरला, तेवटा, आड आणि पंचलडा हार, तर गुजराती संचात चंदन हार, दोडी, मोर आणि कैरी शैलीचा वापर करण्यात आला आहे.
तमिळ आणि तेलुगू संचांमध्ये दक्षिण भारतीय दागिन्यांच्या वैशिष्ट्यांसह मंदिरांच्या वास्तुरचनेपासून प्रेरित डिझाइनचा समावेश आहे. कलीरे, माथापट्टी, वांकी, सूर्य-चंद्र, नेथी चुट्टी आणि मत्तल यांसारखे पारंपरिक दागिनेही या संग्रहात आहेत.
‘वन वेडिंग. मेनी स्टोरीज.’
या संग्रहासाठी ‘One Wedding. Many Stories.’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. लग्नातील दागिने, ठिकाण, छायाचित्रण आणि प्रत्येक वधूची स्वतंत्र कथा यांना एका संकल्पनेत जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रसिद्ध विवाह छायाचित्रकार जोसेफ राधिक यांनी जयपूरमधील ताज जय महाल पॅलेस येथे निवडक वधूंचे साज छायाचित्रित केले आहेत, तर चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांनी विविध प्रादेशिक कथांवर आधारित चित्रफिती तयार केल्या आहेत. दक्षिण भारतातील मोहिमेसाठी अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन रिवाहचे प्रतिनिधित्व करत आहे.
तनिष्कच्या डिझाइन एक्सलन्स सेंटरने विकसित केलेला हा संग्रह तनिष्कच्या दालनांमध्ये तसेच ऑनलाइन उपलब्ध करण्यात आला आहे.

