स्त्री आधार केंद्राच्यावतीने महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण
पुणे.दि.२१: आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच आपत्कालीन किंवा अनुचित घटना घडल्यास तत्काळ मदत करता यावी, यासाठी प्रशिक्षित महिला सुरक्षा स्वयंसेवकांची फळी उभारणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नेत्या, आमदार तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
स्त्री आधार केंद्राच्यावतीने पुणे शहरातील महिला कार्यकर्त्यांसाठी महिला सुरक्षा, कायदे, अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि प्राथमिक उपचार याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.
“गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. महिलांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच इतर महिलांच्या सुरक्षेसाठीही पुढाकार घेतला पाहिजे. आग, अपघात किंवा अन्य आपत्तीच्या प्रसंगी सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी आवश्यक नियमांची माहिती महिलांना असणे गरजेचे आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
अग्निशमन विभागाचे प्रणय मोहिते यांनी आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी आणि आग विझविण्याच्या विविध पद्धतींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सिलेंडरला आग लागल्यास विद्युत उपकरणांचे स्विच चालू-बंद न करणे, इमारतीला आग लागल्यास लिफ्टचा वापर न करता जिन्याने बाहेर पडणे आणि तातडीने १०१ क्रमांकावर संपर्क करणे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत विवेक नायडू यांनी कमीत कमी वेळेत अचूक निर्णय घेण्यासोबतच स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तर हार्ट अटॅक किंवा विजेचा धक्का लागलेल्या व्यक्तीस सीपीआर कसा द्यावा, याबाबत लखन गायकवाड यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
याखेरीज, ऍड. नीलिमा गोखले यांनी हुंडा प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदी आणि महिलांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. हुंड्यासाठी होणारा छळ अथवा अत्याचार झाल्यास महिलांनी कायदेशीर मदत घेऊन तक्रार नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणामुळे सण-उत्सवांच्या काळात महिलांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांची सक्षम फळी तयार होण्यास मदत होणार आहे.

