मुंबई | ९ ऑक्टोबर २०२६
महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आज टिळक भवन येथे आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात ३० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. दिवसभरात एकूण ८४६ मुलाखती पार पडल्या, ४८६ जॉब ऑफर्स देण्यात आल्या, तर २८९ उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांच्या हस्ते झाले. सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणजितसिंग सप्रा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा समारोप झाला.
या मेळाव्यातील विशेष बाब म्हणजे सहभागी उमेदवारांपैकी सुमारे ७० टक्के उमेदवार महिला होत्या, तर ९९ टक्के उमेदवार जेन झी (Gen Z) पिढीतील होते. महिलांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि तरुणांचा प्रतिसाद यामुळे रोजगाराच्या संधींबाबत युवक-युवतींच्या अपेक्षा अधोरेखित झाल्या.
डॉ. रूपा मडकईकर, डॉ. निधी त्रिवेदी आणि श्रीमती मेघना यांनी एकूण ११० उमेदवारांचे समुपदेशन केले. या मार्गदर्शनाच्या माध्यमातून उमेदवारांच्या करिअरविषयक शंकांचे निरसन करणे, त्यांच्या क्षमता ओळखण्यास मदत करणे आणि रोजगार प्रक्रियेसाठी त्यांना अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ॲड. गणेश पाटील, उपाध्यक्ष राजन भोसले आणि प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांच्या सहकार्याने हा रोजगार मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.
या मेळाव्याला माजी खासदार कुमार केतकर, अर्थतज्ज्ञ प्रा. संजीव चांदोरकर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजिंक्य देसाई, डॉ. गजानन देसाई, ज्येष्ठ कामगार नेते मोहन तिवारी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या उपाध्यक्षा मेघा कुलकर्णी आणि राज्य समन्वयक अमोल महाडिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील रोजगार मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर आगामी काळात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड यांसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती धनंजय शिंदे यांनी दिली.

