मुळशीतील चार गावांत मोजणीच्या तारखा निश्चित; मांजरी खुर्दमध्ये 13 तर कोलवडीत 15 ऑक्टोबरपासून मोजणी
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या प्रस्तावित ‘इनर रिंग रोड’च्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांतील विविध गावांमध्ये आयोजित मोजणीपूर्व ग्रामबैठकांना ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मुळशीतील चार गावांमध्ये प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
प्रस्तावित इनर रिंग रोडची रुंदी 65 मीटर असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 9 मीटर रुंदीचे सेवा रस्ते उभारण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी प्रशासनाकडून मोजणीपूर्व ग्रामबैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये भूसंपादन प्रक्रिया, मोबदल्याचे मूल्यांकन आणि पुढील कार्यपद्धतीची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.
मुळशी तालुक्यातील हिंजवडी, जांबे, मारुंजी आणि नांदे या चार गावांतील ग्रामस्थांनी जमीन मोजणीस सहमती दर्शवली आहे. त्यानुसार हिंजवडी येथे 12 ऑक्टोबर, जांबे येथे 13 ऑक्टोबर, मारुंजी येथे 15 ऑक्टोबर, तर नांदे येथे 17 ऑक्टोबर 2026 रोजी प्रत्यक्ष जमीन मोजणी करण्यात येणार आहे.
नेरे आणि माण गावांतील ग्रामस्थांशीही प्रशासनाचा संवाद सुरू असून, त्यांच्या स्थानिक मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मांजरी खुर्दमध्ये 13, कोलवडीत 15 ऑक्टोबरपासून मोजणी
हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे 13 ऑक्टोबरपासून संयुक्त जमीन मोजणी सुरू होणार आहे. तर कोलवडी येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी मोजणीस सहमती दर्शवल्यानंतर 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष मोजणी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोलवडीतील बैठकीत भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या.
घरे, झाडे, विहिरींचेही पंचनामे
जमीन मोजणीद्वारे बाधित क्षेत्र निश्चित झाल्यानंतर संबंधित विभागांकडून त्या क्षेत्रातील घरे, झाडे, विहिरी, कूपनलिका आणि पाइपलाइनचे पंचनामे करण्यात येणार आहेत.
भूसंपादनाची अधिसूचना झाल्यानंतर मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती मागवून जमिनींचे मूल्यांकन केले जाईल. बाजारभाव आणि संबंधित व्यवहारांचा विचार करून मोबदला निश्चित केला जाईल.
“बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाकडून दक्षता घेतली जाईल,” असे भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले.
बाजारभावानुसार मोबदल्याची शेतकऱ्यांची मागणी
कोलवडीतील बैठकीत शेतकऱ्यांनी मांजरी खुर्दप्रमाणे बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी केली. शेतकरी तथा पत्रकार अशोक आहाळे यांनी मोबदला निश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली.
मोजणी पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्राची माहिती प्रसिद्ध करून मोबदला निश्चित करण्यासाठी बैठक घेतली जाईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून निर्णय घेतले जातील, असे उदमले यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, नितेश झुले, उमेश मुरकुटे, सदाशिव उंद्रे, मधुकर उंद्रे, शिवाजी शेटके, आनंदा उंद्रे, कोलवडी ग्रामपंचायतीचे लिपिक संतोष गायकवाड यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.
पीएमआरडीएचे शाखा अभियंता कार्तिक पाटील, कनिष्ठ लिपिक रोहित चोपडे, मोजणी कर्मचारी मदन बारबरे आणि गावकामगार तलाठी अर्जुन साळी यांनीही बैठकीत सहभाग घेतला.
डिसेंबरअखेर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
मावळ तालुक्यातील धामणे येथे पद्मावती देवी मंदिरात झालेल्या बैठकीतही ग्रामस्थांनी विविध पर्याय आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. प्रशासनाने या सूचनांची सकारात्मक दखल घेतली आहे.
इनर रिंग रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे पीएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. ग्रामस्थांशी संवाद, पारदर्शक कार्यपद्धती आणि बाधित शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रक्रिया पुढे नेण्यात येत असल्याचे पीएमआरडीएने स्पष्ट केले.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी व्यक्त केली.

