पुणे, दि. २० : चाकणसह पुणे जिल्ह्यात नवीन उद्योग तसेच Global Capability Centres (GCCs) मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागांकडून आवश्यक मंजुरी, परवानग्या आणि सेवा मिळविताना उद्भवणाऱ्या प्रलंबित बाबींचे जलद निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.
चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
उद्योगांशी संबंधित कोणतीही तक्रार अथवा समस्या असल्यास नागरिक, उद्योजक आणि संबंधित घटकांनी ०२०-२६१३००९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तक्रारी collector.pune@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात.
तक्रार दाखल करताना तक्रारीचे स्वरूप, संबंधित उद्योगाचे नाव, संपर्क क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रे किंवा उपलब्ध माहिती सोबत सादर करावी. यामुळे प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधत कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
चाकण परिसरासह पुणे जिल्ह्यातील उद्योगांना शासकीय सेवा व परवानग्या मिळविताना येणाऱ्या अडचणींचे प्रभावी आणि वेळेत निराकरण करण्यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

