पुणे -: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक गौरव गणेश घुले यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशशेठ सोपानराव घुले, संचालक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल ३८३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त सातत्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.शिबिरात युवकांसह विविध वयोगटांतील नागरिकांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढत असून रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमातील त्यांचा सहभाग प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जनसेवा ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराचे संपूर्ण नियोजन संकेत कोठावळे यांनी केले.या सामाजिक उपक्रमाला जय शारदागजानन आडते असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नगरसेवक राजेंद्र (आबा) शिळीमकर यांनी शिबिराला सदिच्छा भेट देत रक्तदाते, आयोजक आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले.आरोग्य, सामाजिक सेवा आणि जनकल्याणाशी संबंधित अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून यापुढेही नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार नगरसेवक गौरव गणेश घुले यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाला रक्तदानातून समाजसेवेचा संदेश; नगरसेवक गौरव घुले यांच्या शिबिरात ३८३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Date:

