म्हाळुंगेसह सर्व समाविष्ट गावांचे स्थळनिहाय सर्वेक्षण करण्याचे निर्देश; तात्पुरत्या डागडुजीऐवजी दर्जेदार व टिकाऊ कामांवर भर
पुणे : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील खराब रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांची गंभीर दखल घेत महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित विभागांना रस्ते आणि ड्रेनेजची कामे तातडीने हाती घेऊन त्यांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हाळुंगे गावासह सर्व नवीन समाविष्ट गावांतील परिस्थितीची स्थळनिहाय पाहणी करून आवश्यक कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.नवीन समाविष्ट गावांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाली असून काही भागांतील रस्ते अद्याप अपूर्ण आहेत. त्यातच अपुरी ड्रेनेज व्यवस्था, पावसाळ्यात रस्त्यांवर साचणारे पाणी आणि चिखल यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसह दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर महापौर नागपुरे यांनी म्हाळुंगेसह सर्व नवीन समाविष्ट गावांतील प्रमुख आणि अंतर्गत रस्ते तसेच ड्रेनेज व्यवस्थेची प्रत्यक्ष स्थळनिहाय पाहणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पाहणीनंतर आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून तातडीची कामे प्रथम पूर्ण करण्यात यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.“नवीन समाविष्ट गावांतील नागरिकांनाही पुणे शहरातील इतर भागांप्रमाणे दर्जेदार मूलभूत नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रस्ते आणि ड्रेनेजसारख्या अत्यावश्यक सुविधांच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून कामांना गती द्यावी,” असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.प्रत्येक नवीन समाविष्ट गावातील रस्ते आणि ड्रेनेजच्या समस्यांचे स्थळनिहाय सर्वेक्षण करण्यात यावे. त्यानुसार कामांचा प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक निधी आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने करणे आवश्यक असलेल्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही महापौरांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.रस्त्यांची दुरुस्ती करताना केवळ तात्पुरती डागडुजी न करता कामांचा दर्जा आणि टिकाऊपणा यावर भर देण्यात यावा. तसेच ड्रेनेजमधील अडथळे दूर करून पावसाचे पाणी रस्त्यांवर साचणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.नवीन समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास करणे हा महापालिकेच्या प्राधान्यक्रमाचा भाग असल्याचे महापौर नागपुरे यांनी नमूद केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून वेळबद्ध पद्धतीने काम करावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

