- सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध; चोरीचा मोबाईल व गुन्ह्यातील मोटारसायकलसह ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे : – पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात पायी जाणाऱ्या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्याच्याकडून हिसकावलेला मोबाईल आणि गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील स्वर्णा हॉटेलशेजारी असलेल्या डिकॅथलॉन, वडगाव बुद्रुक परिसरात फिर्यादी तरुणी तिच्या मुळगावी पायी जाण्यासाठी थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी दुचाकीस्वाराने तिच्याजवळ येऊन बोलण्यात गुंतवले. त्यानंतर तिच्या हातातील व्हिवो कंपनीचा मोबाईल हिसकावून तो दुचाकीवरून पसार झाला.या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी आरोपीचा शोध सुरू केला. पुणे-बंगळुरू महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते.तपासादरम्यान पोलीस अंमलदार सतीश मोरे आणि तानाजी सागर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. शिवतेज नगर म्हसोबा मंदिराजवळील जुन्या बिल्डिंगमध्ये काळे पडळ, पुणे येथे एक संशयित इसम थांबला असून त्याच्या अंगात कॉफी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची साधी पँट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना ही माहिती देण्यात आली. वरिष्ठांना माहिती कळविल्यानंतर पोलिसांचे पथक तत्काळ संबंधित ठिकाणी रवाना झाले. मिळालेल्या वर्णनानुसार एक इसम तेथे थांबलेला दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अभय गणपत येवले (वय २६, रा. त्रिमूर्ती कॉलनी, म्हसोबा मंदिराजवळ, प्लॉट नं. १५, काळेपडळ, हडपसर, पुणे) असे सांगितले.पोलिसांनी त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून फिर्यादीचा हिसकावून चोरी केलेला मोबाईल फोन तसेच गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सतीश मोरे करीत आहेत.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम ताठ, आण्णा केकाण, विकास बांदल, सतीश मोरे, तानाजी सागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, संदीप कांबळे, समीर माळवदकर आणि शिरीष गावडे यांच्या पथकाने केली.

