पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या ख्रिश्चन आघाडीच्या १६ नवीन शाखांचे पुणे शहरात भव्य उद्घाटन करण्यात आले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या शाखांची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, नगरसेविका हिमाली कांबळे, सरचिटणीस शाम सदाफुले, सुनिल गवळी, विनोद टोपे, ख्रिश्चन आघाडी अध्यक्ष क्रिस्टोपर राजमनी, महिला अध्यक्षा डोर्थी थॉमस आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ख्रिश्चन समाजातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक व विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याबरोबरच संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांचा प्रसार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवीन शाखांच्या माध्यमातून पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविणे, युवकांना संघटनेशी जोडणे तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात पुणे शहरातील विविध भागांत संघटन विस्ताराला अधिक गती देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आरपीआय (आठवले)चे पदाधिकारी, ख्रिश्चन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
दरम्यान, पुण्यात ख्रिश्चन आघाडीच्या १६ नवीन शाखांची स्थापना झाल्याने आरपीआयच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळणार असून आगामी काळात शहरातील सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये आघाडी अधिक सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

