पुणे, दि. १६: भारताच्या ८० व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत व आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या सहकार्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता ‘मोफत आरोग्य तपासणी शिबीर’ व रक्तदान शिबीराचे पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच आयोजन करण्यात आले.
या उपक्रमातून पुणे येथे सुमारे २५३ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. सुमारे ३०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, छत्रपती संभाजीनगर येथे १०३ बाटल्या रक्त संकलन झाले. या उपक्रमात नगररचना आणि मुल्यनिर्धारण संचालनालय व्यतिरिक्त पुणे, कोकण, नागपूर, नाशिक व अमरावती विभागातील आजी -माजी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. पुणे विभागातून पुणे, बारामती, सोलापूर व सांगली शाखा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमास आरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवाड, पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाचे संचालक अविनाश पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ संचालक सुनिल मरळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संचालक राजेंद्र पवार, तसेच विभागीय सहसंचालक विजय शेंडे धनंजय खोत, विजयकुमार वाघमोडे, प्रसाद गायकवाड उपस्थित होते.
नगर रचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे यांनी उपस्थितांचे व तज्ञ वैद्यकीय अधिकारी व सहकाऱ्यांचे आभार मानले.

