- वाघोली आणि लोणावळ्यात शौर्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव; आपत्कालीन परिस्थितीत दिलेल्या अमूल्य सेवेची दखल!
पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त (दि. १५) विशेष सन्मान करण्यात आला. वाघोली आणि लोणावळा येथे आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जवानांनी बजावलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या कोणत्याही आगीच्या दुर्घटना असोत किंवा आपत्कालीन बचावकार्य (रेस्क्यू), वाघोली अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नेहमीच तत्परतेने आणि जीवाची बाजी लावत प्रतिसाद दिला आहे. जवानांच्या याच अतुलनीय कामगिरीची दखल घेत, वाघोली येथील विष्णूजी शेकूजी सातव हायस्कूलमध्ये आयोजित एका विशेष गौरव सोहळ्यात अग्निशमन जवानांचा सत्कार करण्यात आला.
दुसरीकडे, जुलै महिन्यात लोणावळा आणि परिसराला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या कठीण काळात ‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन दल व पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (पीडीआरएफ) जवानांनी संकटसमयी नागरिकांना मोलाचे सहकार्य केले. तसेच, मोठी जीवित व वित्तीय हानी टाळली. अतिवृष्टीच्या काळात त्यांनी बजावलेल्या या धाडसी आणि अमूल्य सेवेची दखल लोणावळा नगरपरिषदेने घेतली. नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात या जवानांचा विशेष सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ऊन, वारा, पाऊस किंवा आगीचे भीषण संकट असो, ‘पीएमआरडीए’चे अग्निशमन दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे उभे असल्याचे या सन्मानातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

