मुंबई-१५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना राष्ट्रगीताच्या सन्मानाला ठेच पोहोचविणारे कृत्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने आज मुंबईतील सहाही जिल्ह्यांमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार श्री.अमित साटम जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले.
याच अनुषंगाने दादर पूर्व येथील श्री स्वामीनारायण मंदिरासमोरही भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी ‘वंदे मातरम्’च्या सन्मानाचे आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा संकल्प करत कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन केले. तसेच काँग्रेस नेत्यांच्या कथित अनादराच्या विरोधात आपला तीव्र आणि लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला.
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री.दीपक सिंह म्हणाले, “मोदीविरोधाच्या अंधारात बुडालेली काँग्रेस आता राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करण्यापर्यंत पोहोचली आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचा विरोध करता करता काँग्रेस पक्ष आता देश आणि देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांचाही विरोध करण्याच्या मानसिकतेत उतरला आहे. श्रीमती सोनिया गांधी आणि श्री. राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा केलेला अनादर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे. या घटनेतून काँग्रेसचे खरे स्वरूप देशासमोर आले आहे.”
ते पुढे म्हणाले, “लाखो-कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तांच्या मनात ‘वंदे मातरम्’ने राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित केली होती. हे गीत गाताना स्वातंत्र्यसैनिकांवर ब्रिटिश सत्तेने लाठीमार केला, त्यांना तुरुंगात डांबले; मात्र त्यांनी राष्ट्रभक्तीची भावना कधीही सोडली नाही. आज २०२६ मध्येही राष्ट्रगीताच्या सन्मानाबाबत काँग्रेसची मानसिकता बदललेली दिसत नाही. काँग्रेसची कथनी आणि करणी यातील फरक देशातील जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे.”
ते म्हणाले, “ज्या ‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्यसैनिकांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्वाला चेतवली, त्याचा अवमान म्हणजे देशाचा आणि कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा अपमान आहे. राजकीय विरोधालाही एक मर्यादा असते. राजकीय स्वार्थासाठी राष्ट्राचा गौरव आणि राष्ट्रीय भावनांशी खेळ करणे देश कदापि स्वीकारणार नाही.”
भाजयुमो मुंबई राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी सदैव ठामपणे उभे राहील. राजकीय विरोधाच्या नावाखाली राष्ट्रीय भावना आणि देशाच्या गौरवाला ठेच पोहोचविणाऱ्या प्रत्येक मानसिकतेविरोधात भाजयुमो मुंबईचा हा संघर्ष सुरूच राहील.
या आंदोलनास भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने देशभक्त नागरिक उपस्थित होते.

