पुणे, दि. १५ ऑगस्ट २०२६ :
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील तसेच शहरातील भटक्या व मोकाट जनावरांच्या संरक्षणासाठी आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, चारा बँक, पुनर्वसन केंद्र, लसीकरण केंद्र आदी सुविधा निर्माण करण्याबाबतचा ठराव स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सादर केला होता. या प्रस्तावावर संबंधित विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला होता. सदर अभिप्राय सकारात्मक प्राप्त झाल्यानंतर काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या ठरावास मान्यता देण्यात आली.
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतूक यामुळे मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच जनावरांच्या आरोग्याशी संबंधित समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावानुसार आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय उपचार व लसीकरण सुविधा, चारा व्यवस्थापन, पुनर्वसन व संगोपन केंद्र उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. “मोकाट जनावरांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींचा समतोल साधणे आवश्यक आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास दिलेली मान्यता हा त्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय असून, आता प्रशासनाने त्याची प्रभावी व तातडीने अंमलबजावणी करावी,” अशी अपेक्षा सुहास टिंगरे यांनी व्यक्त केली.

