नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; शिष्यवृत्तीधारक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पुणे : देशभक्तीपर गीते, आकर्षक संचलन, कवायत, सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रेरणादायी व्यक्तिरेखांनी भारलेल्या वातावरणात पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक ९४ बी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संचलन, कवायत, देशभक्तीपर गीते, नृत्य आणि संगीताचे सादरीकरण केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिरेखाही विद्यार्थ्यांनी साकारल्या. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीने साकारलेले ‘स्त्रीशक्ती’चे प्रतीक विशेष आकर्षण ठरले.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन मानकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी मानकर म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा त्याग विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहिला पाहिजे. विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन महत्त्वाचे असून, त्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पालकांनी नियमित सहभाग घ्यावा, असे आवाहनही मानकर यांनी केले. पालकांचा सक्रिय सहभाग राहिल्यास विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देता येतील, असे त्यांनी सांगितले.
“आपली शाळा मॉडेल स्कूल म्हणून निवडली गेली आहे, ही अभिमानाची बाब आहे. शाळेच्या पुढील विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच इयत्ता ८ वी आणि १० वीचे वर्ग सुरू करण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे,” असे मानकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगिता बारवे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दमयंती राऊत आणि सुमेघा खडतरे यांनी केले. कार्यक्रमासाठी वैशाली डेरे, मयुरी गुजर, खैरे सर, सारिका बुचडे, प्रतीक्षा मिंड, अमोल हरपुडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सारिका खुळे, वंदना साळवे, सोनावणे ताई यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांच्या नियोजनामुळे मनपा शाळा क्रमांक ९४ बीमधील स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला.

