रामवाडी–शिरूर,सोलापूर रोड डबल डेकर प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती; मेट्रो स्थानकांजवळ पार्किंग सुविधांवरही भर
पुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मेट्रो, एचसीएमटीआर, डबल डेकर उड्डाणपूल, विविध उड्डाणपूल, पार्किंग तसेच सुरू असलेल्या आणि प्रस्तावित पायाभूत प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन करण्यावर पुणे महानगरपालिकेने भर दिला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १४) झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहरातील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.बैठकीत रामवाडी–शिरूर डबल डेकर उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पाच्या समन्वयावर प्रामुख्याने चर्चा झाली. विकास आराखड्यानुसार प्रकल्पाचे संरेखन कायम ठेवण्यासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया प्राधान्याने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. संरेखनातील वळणांमुळे आवश्यक असलेल्या संभाव्य सुधारणांची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.खराडी बायपास आणि वाघोलीनंतर निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक चढ-उतार मार्गांचे नियोजन केले जाणार आहे. गुंजन चौकातील भविष्यातील स्तरविभाजनासह आव्हाळवाडी फाटा आणि केसनंद फाटा येथे उजवीकडे वळणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी संयुक्त नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.HCMTR आणि मेट्रोचे एकात्मिक नियोजनएचसीएमटीआर आणि मेट्रो मार्गांच्या छेदनबिंदूंच्या ठिकाणी रस्त्यांची पातळी, चढ-उतार मार्गांची लांबी, संरचनात्मक व्यवहार्यता आणि भविष्यातील वाहतुकीची गरज विचारात घेऊन एकात्मिक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.नगर रोडवरील एचसीएमटीआर–मेट्रोची पातळी आणि चढ-उतार मार्गाच्या व्यवहार्यतेची तपासणी केली जाणार आहे. सिंहगड रोड आणि नवीन विमानतळ मार्गावर दोन्ही प्रकल्प एकाच मार्गिकेत प्रस्तावित असल्याने पहिल्या पातळीवर HCMTR आणि दुसऱ्या पातळीवर मेट्रो ठेवण्याच्या अनुषंगाने विशेष समन्वय साधण्याचे ठरले.वनाज–चांदणी चौक मार्गावर विशेष लक्षवनाज–चांदणी चौक मेट्रो आणि एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. कोथरूड बस डेपो चौकात बसची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने तेथील डिझाईनची वाहतूक व प्रकल्प विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. चांदणी चौकातील वाहतूक विलिनीकरणाची व्यवस्था महापालिकेच्या वाहतूक नियोजनानुसार अंतिम केली जाणार आहे.मेट्रो स्थानकांपासून ५०० मीटर परिसरात पार्किंगमेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिसरातील पार्किंग आरक्षणे आणि सुविधा क्षेत्रांबाबत पुणे महापालिकेने केलेला अभ्यास बैठकीत सादर करण्यात आला. मेट्रो प्रवाशांना शेवटच्या टप्प्यातील वाहतूक जोडणी सुलभ व्हावी यासाठी महापालिका आणि महा-मेट्रो संयुक्तपणे पार्किंग सुविधा विकसित करणार आहेत.पार्किंग सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी असावी आणि नफा कमावणे हा त्यामागील प्राथमिक उद्देश नसावा, यावर बैठकीत एकमत झाले.सोलापूर रोडवरील डबल डेकर प्रकल्पासाठी भूसंपादनाला गतीसोलापूर रोडवरील मेट्रोसोबत प्रस्तावित एकात्मिक डबल डेकर पूल प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. भैरोबा नाला, बी. टी. कवडे रोड, ग्लोबल हॉस्पिटल जंक्शन, गाडीतळ जंक्शन आणि मांजरी फाटा या महत्त्वाच्या वाहतूक ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.वाहतूक नियोजन अधिक अचूक करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडील उपलब्ध गुगल वाहतूक माहिती आणि महा-मेट्रोकडील वाहतूक नमुना-आधारित माहिती संबंधित यंत्रणांमध्ये सामायिक करण्यास सहमती देण्यात आली. एचसीएमटीआरसह अन्य मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या नियोजनात या माहितीचा समन्वयाने वापर केला जाणार आहे.शहरातील विविध पायाभूत प्रकल्पांचे परस्पर समन्वयाने नियोजन करून भविष्यातील वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण ठिकाणे टाळणे, भूसंपादन वेळेत पूर्ण करणे तसेच नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्यासह पुणे महानगरपालिका, महा-मेट्रो आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

