३८ वर्षांची पोलीस सेवा; वाहनचोरीच्या २३८ गुन्ह्यांची उकल, CCTNS-ICJS अंमलबजावणीतही महत्त्वपूर्ण योगदान
पुणे : महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पुणे मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आनंद कदम यांना स्वातंत्र्य दिन २०२६ निमित्त गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.
जितेंद्र कदम यांनी १९८८ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेला सुरुवात केली. २००४ मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यानंतर नागपूर शहर, महामार्ग सुरक्षा विभाग, मुंबई शहर यासह विविध ठिकाणी त्यांनी काम केले आहे.
पुणे शहरात गुन्हे शाखा तसेच वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी अटक केलेल्या व दोषी ठरलेल्या आरोपींच्या तसेच चोरीला गेलेल्या वाहनांच्या मागील दहा वर्षांतील नोंदींचे संकलन आणि विश्लेषण केले. या विश्लेषणाच्या आधारे २३८ चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यात त्यांना यश आले. तसेच साखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नागपूर येथे कार्यरत असताना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर बाहेर पडून फरार झालेला आणि बनावट ओळख धारण करून राहत असलेला आरोपी शोधून काढण्यातही कदम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कदम यांनी २००२ मध्ये MSPDM स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तसेच बंगळुरू येथे झालेल्या ४६ व्या AIPDM स्पर्धेतील संगणक विभागात महाराष्ट्राला द्वितीय क्रमांक मिळवून देण्यात त्यांचे योगदान राहिले.
महाराष्ट्रात ICJS आणि CCTNS प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्राला डिसेंबर २०२० मध्ये NCRB परिषदेत ICJS व CCTNS अंमलबजावणीसाठी प्रथम, तर डिसेंबर २०२१ मध्ये द्वितीय पारितोषिक मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या सेवाकाळात त्यांना २५५ बक्षिसे मिळाली असून ५ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले होते.
जुलै २०२४ पासून लागू झालेल्या नवीन न्याय संहितांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील CCTNS व eSummons प्रणालीच्या कार्यान्वयनातही कदम यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे CIDच्या माहितीत म्हटले आहे. गुन्हे अन्वेषण, माहिती संकलन व विश्लेषण, तांत्रिक प्रणालींची अंमलबजावणी आणि फरार आरोपींचा शोध या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ कामगिरीची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

