कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम, अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळे
मुंबई- रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा भूभाग खचला आणि कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, 4 जण जखमी झाले आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान, पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग खचला आणि माती, तसेच दगडांचे मोठे ढिगारे खाली असलेल्या दोन-तीन घरांवर येऊन कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने घरातील नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

