बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा छापा; बी. जी. लोणकर रोडवरील स्पा सेंटरवर कारवाई
पुणे : कोंढवा परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेत देहविक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून कोंढवा पोलिसांनी छापा टाकून स्पा व्यवस्थापकाला अटक केली असून तीन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई १० ऑगस्ट रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी. जी. लोणकर रोडवरील ‘रिफ्रेश स्पा सेंटर’ येथे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर खात्री झाल्यावर पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला.
तपासणीदरम्यान तेथे तीन महिला आढळल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्यवस्थापकाने या महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणले आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रय करवून घेतल्याचा आरोप आहे. संबंधित व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

