चंदननगर पोलिसांनी चंद्रपूरमधून आरोपीला पकडले; सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या ८.५० लाखांची रोकड जप्त
पुणे : बांधकाम कंपनीचा मालक असल्याचे भासवून चंदननगरमधील सराफाचा विश्वास संपादन करत १४ लाख ७८ हजार ७६० रुपये किमतीची १०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका आरोपीला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीने सोन्याची बिस्किटे विकून मिळवलेल्या रकमेतून ८ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ४ ऑगस्टदरम्यान जुना मुंढवा रोडवरील द्वारका गार्डनजवळील चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. येथे आरोपी सिद्धार्थ झेंडे आणि एका महिलेने संगनमत करून सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाचा विश्वास संपादन केला. त्यांनी २५ ग्रॅमची दोन आणि ५० ग्रॅमचे एक अशी एकूण तीन सोन्याची बिस्किटे घेतली. बिलाची रक्कम भरण्यासाठी एका बँक खात्याचा क्रमांक देण्यात आला; मात्र त्या खात्यात पैसे नसल्याचे माहिती असूनही तो क्रमांक देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याबाबत सराफाच्या सहाय्यक शाखा व्यवस्थापकाने ६ ऑगस्ट रोजी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणातून चंद्रपूरमध्ये शोध
आरोपी आपल्या मूळ गावी नसल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून तो चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत फसवणुकीने घेतलेली सोन्याची बिस्किटे इंदापूरमधील एका सोनाराला विकल्याचे आणि त्याबदल्यात रोख रक्कम घेतल्याचे समोर आले. त्यापैकी ८ लाख ५० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.
पोलिसांच्या तपासानुसार आरोपी स्वतःला ‘प्रगती बिल्डकॉन’ कंपनीचा मालक असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत असल्याचा आरोप आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील विविध व्यावसायिकांची तसेच काही महिलांची फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही भिगवण आणि विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

