‘जंतरमंतरकडे तोंड आणि रांचीकडे पाठ’; विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची भाजपची टीका
मुंबई : झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी रांची येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. “रांचीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न राहुल गांधी आता विचारणार आहेत का? आणि यासाठी ते कुणाचा राजीनामा मागणार?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आणि माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.
‘शांततापूर्ण आंदोलनावर कठोर कारवाई’
शेलार यांच्या म्हणण्यानुसार, रांची येथे विद्यार्थी शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असताना त्यांच्या मार्गात काटेरी तार लावण्यात आली, अश्रुधुराचा वापर करण्यात आला आणि लाठीमार करण्यात आला. या कारवाईचा निषेध करत त्यांनी झारखंड सरकारवर टीका केली.
झारखंड सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी असल्याचा उल्लेख करत शेलार म्हणाले की, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी.
‘दिल्लीतील सहानुभूती रांचीला कुठे गेली?’
शेलार यांनी राहुल गांधींसह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “दिल्लीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सहानुभूती दाखवणारे राहुल गांधी रांचीतील विद्यार्थ्यांना भेटायला का जात नाहीत? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या प्रकरणावर गप्प का आहेत?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे विद्यार्थ्यांवरील प्रेम हे राजकीय सोयीचे असल्याचा आरोप करत, जिथे विरोधकांचे सरकार असते तिथे ते गप्प राहतात आणि जिथे राजकीय फायदा मिळू शकतो तिथे आंदोलन करतात, अशी टीका त्यांनी केली.
‘विद्यार्थ्यांच्या पाठीशी भाजप’
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी शेलार यांनी केली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा भाजप तीव्र निषेध करत असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसने आणि राहुल गांधींनी देशातील तरुणांची माफी मागावी, अशी मागणी केली.
सीजेपीच्या संभाव्य भूमिकेवरही त्यांनी टीका करत, विद्यार्थ्यांचे आंदोलन अनेक दिवस सुरू असताना त्यांची दखल घेतली गेली नाही आणि उशिरा समर्थन दिले जात असेल तर ते “वरातीमागून घोडे” असल्याचा टोला लगावला.
‘राहुल गांधी, लोकसभेतून पळू नका’
संसदेतील कामकाजावरूनही शेलार यांनी राहुल गांधींवर टीका केली. संसद ही जनतेचे प्रश्न सोडविण्याची जागा असून विरोधकांकडून केवळ गोंधळ घालण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“राहुल गांधी, लोकसभेतून पळून जाऊ नका. चर्चेला घाबरू नका. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत उपस्थित राहणार आहेत; त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा,” असा टोला शेलार यांनी लगावला.

