टिळक भवनमध्ये काँग्रेस कोअर कमिटीची बैठक; राज्यातील महत्त्वाचे प्रश्न, SIR आणि पुढील रणनितीवर चर्चा
मुंबई, दि. ११ ऑगस्ट २०२६ : काँग्रेस नेते राहुल गांधी हे पळणारे नसून लढणारे नेते आहेत. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधक सातत्याने करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चेपासून दूर राहतात; त्यामुळे खरे पळपुटे कोण आहेत, हे जनतेने ठरवावे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
टिळक भवन येथे सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत राज्यातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक प्रश्नांसह आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ उपस्थित होते.
‘तिरंग्याचे प्रेम स्वागतार्ह, पण यामागे कावा नसावा’
तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका केली. संघाने पूर्वी तिरंग्याला विरोध केल्याचा आणि अनेक वर्षे आपल्या कार्यालयावर राष्ट्रध्वज न फडकवल्याचा दावा त्यांनी केला.
“आज त्यांना तिरंग्याचे प्रेम वाटत असेल तर त्याचे स्वागतच आहे — देर आये दुरुस्त आये. मात्र यामागे भाजपा आणि आरएसएसचा काही राजकीय कावा नसावा,” असे सपकाळ म्हणाले.
महागाई, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारवर निशाणा
भाजप सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत सपकाळ यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला.
जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाती-धर्माच्या नावावर द्वेष निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
SIR वरही चर्चा; ६५ हजार BLA-2 नियुक्त केल्याचा दावा
कोअर कमिटीच्या बैठकीत SIR संदर्भातही चर्चा करण्यात आली. काँग्रेसने आतापर्यंत राज्यात सुमारे ६५ हजार BLA-2 नियुक्त केले असून BLA-1 नियुक्तीची प्रक्रियाही करण्यात आल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.
यापुढे कोअर कमिटीची बैठक दर महिन्याला घेण्याचा निर्णयही करण्यात आला.
‘भाजप खासदारांचे आंदोलन हास्यास्पद’
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदारांनी संसद परिसरात केलेल्या आंदोलनावर सपकाळ यांनी टीका केली.
पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीसह देशभरात तरुणांनी आंदोलने केली तेव्हा विद्यार्थ्यांवर लाठीहल्ले झाल्याचा आरोप करत, त्या वेळी भाजप खासदारांनी अशीच भूमिका घ्यायला हवी होती, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला चुकीचा असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे, असेही सपकाळ यांनी नमूद केले.
‘मोदी-शाह हेच खरे पळपुटे’
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले, “राहुल गांधी हे पळणारे नेते नाहीत, ते लढणारे नेते आहेत. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत संसदेत चर्चा करण्याची मागणी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चेत सहभागी होत नाहीत.”
पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत आणि अमित शाह चर्चेपासून पळ काढतात, असा आरोप करत सपकाळ यांनी त्यांनाच “खरे पळपुटे” संबोधले.
भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत, “राहुल गांधींना पळ काढणारे म्हणणाऱ्यांनी स्वतः काँग्रेस पक्षातून पळ काढला,” असा टोला लगावला.

