५४ मीटर ‘ओपन वेब गर्डर’चे सप्टेंबरअखेर लॉन्चिंग; दरमहा प्रत्यक्ष जागेवर कामाचा आढावा घेणार आयुक्त
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या साधू वासवाणी पूल प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. प्रकल्पाची तांत्रिक गुंतागुंत, रेल्वे वाहतुकीची व्यस्तता आणि विविध विभागांशी आवश्यक असलेला समन्वय यांचा आढावा घेत त्यांनी डिसेंबर २०२६ अखेर प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि रेल्वे विभागाशी आवश्यक समन्वय साधून परवानग्या व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती देण्यात आली असून, मूळ कामाची मुदत अडीच वर्षांची आहे. प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या दिवसापासून या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
२४० हून अधिक रेल्वेगाड्यांमुळे काम आव्हानात्मक
साधू वासवाणी येथील रेल्वे मार्गावरील सुमारे ५४ मीटर लांबीचा ‘ओपन वेब गर्डर रेल्वे स्पॅन’ हा संपूर्ण प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक भाग आहे. या मार्गावरून दररोज २४० पेक्षा अधिक रेल्वेगाड्यांची वाहतूक होत असल्याने रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता कायम ठेवून काम करावे लागत आहे.
रेल्वे स्पॅनच्या ठिकाणी असलेली एक मीटर व्यासाची जुनी ओव्हरहेड पाणीवाहिनी प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरत होती. ही पाणीवाहिनी स्थलांतरित करून आता भूमिगत पद्धतीने टाकण्यात आली आहे.
आठवड्यात ट्रस काढणार; सप्टेंबरअखेर गर्डर लॉन्चिंग
रेल्वे स्पॅनच्या ठिकाणी असलेले विद्यमान ओव्हरहेड ट्रस स्ट्रक्चर काढण्याचे काम महापालिकेच्या प्रकल्प विभागाने नव्याने नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत हाती घेतले आहे. हे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर ५४ मीटर लांबीच्या ओपन वेब गर्डरचे लॉन्चिंग सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रेल्वे स्पॅनचे काम पूर्ण होताच उर्वरित तीन स्पॅनची कामे एकाचवेळी हाती घेऊन प्रकल्पाला अधिक गती दिली जाणार आहे.
आयुक्त दरमहा घेणार प्रत्यक्ष आढावा
प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी आयुक्त नवल किशोर राम स्वतः दर महिन्याला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेणार आहेत. रेल्वे विभाग, वाहतूक पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून सुरक्षा आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करत काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, उपायुक्त आशा राऊत, उपायुक्त संतोष वारुळे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

