भाजप ‘रॅली’ काढून १५-२० हजार दुचाकी रस्त्यावर उतरवून पुणेकरांना कोंडीत ढकलणार काय ? रॅलीऐवजी खड्डे बुजवा, झाडे लावा”— अमोल बालवडकर

Date:

“वरिष्ठांना शक्तिप्रदर्शन दाखवण्यासाठी पुणेकरांना वेठीस धरू नका

पुणे : आधीच भीषण वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या पुणे शहरात भारतीय जनता पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या भव्य दुचाकी तिरंगा रॅलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जोरदार टीका केली आहे. तब्बल १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर उतरवून राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन करण्यापेक्षा पुणेकरांच्या दैनंदिन समस्यांवर लक्ष केंद्रित करावे, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या या नियोजित रॅलीवर निशाणा साधला आहे.

बालवडकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडताना या रॅलीच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आधीच वाहतूक कोंडीशी झुंजणाऱ्या पुण्यात हजारो दुचाकी एकाच वेळी रस्त्यावर आणण्याचा निर्णय नेमका कोणाच्या हितासाठी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“१५-२० हजार दुचाकी रस्त्यावर आणून कसली राष्ट्रभक्ती?”

बालवडकर यांनी दावा केला की, पुण्यातील प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याला ५० ते १०० दुचाकी आणण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी शहराच्या रस्त्यांवर उतरल्यास त्याचा सर्वाधिक फटका सामान्य पुणेकरांनाच बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“पुणे शहर आधीच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर आणून कसली राष्ट्रभक्ती दाखवली जात आहे? राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी सामान्य पुणेकरांचा वेळ, इंधन आणि संयम यांचा बळी का दिला जात आहे?” असा सवाल बालवडकर यांनी केला.

ध्वनी-वायू प्रदूषण आणि वाहतुकीवरील परिणामाची भीती

मोठ्या प्रमाणावर दुचाकी रस्त्यावर उतरल्यास केवळ वाहतूक कोंडीच वाढणार नाही, तर ध्वनी आणि वायू प्रदूषणातही वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. रॅलीच्या मार्गावरील वाहतुकीचा परिणाम रुग्णवाहिका, रुग्ण, महिला, विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

“वरिष्ठांच्या नजरेत भरण्यासाठी पुणेकरांना वेठीस धरू नका”

या रॅलीमागे राष्ट्रभक्तीपेक्षा राजकीय शक्तिप्रदर्शनाचा हेतू अधिक असल्याचा थेट आरोपही बालवडकर यांनी केला आहे. वरिष्ठ नेत्यांसमोर आपली ताकद दाखवण्यासाठी हजारो वाहने गोळा करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर त्याची किंमत पुणेकरांनी का मोजावी, असा त्यांचा सवाल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधन बचतीचे आवाहन करत असताना, दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते हजारो दुचाकींची रॅली काढत असतील, तर हा स्पष्ट विरोधाभास नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

“रॅली नको; खड्डे बुजवा, वृक्षारोपण करा”

भाजपने हजारो दुचाकींची रॅली काढण्याऐवजी पुणेकरांच्या प्रत्यक्ष उपयोगाचे उपक्रम राबवावेत, असा टोला बालवडकर यांनी लगावला.

“खरोखर राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा करायची असेल तर शहरातील खड्डे बुजवा, वृक्षारोपण करा, रक्तदान शिबिरे घ्या किंवा स्वच्छता अभियान राबवा. त्यातून पुणेकरांचे काहीतरी भले होईल. केवळ वरिष्ठ नेत्यांना आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकवू नका,” असेही त्यांनी म्हटले आहे.

११ ऑगस्टच्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाद

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुणे शहरात मंगळवारी (११ ऑगस्ट) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या रॅलीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी थेट रॅलीच्या नियोजनालाच आव्हान दिल्याने या मुद्द्यावर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

रॅलीचा हट्ट कायम ठेवून नियोजनशून्य पद्धतीने पुणेकरांना वाहतूक कोंडीत ढकलले, तर आगामी काळात पुणेकर स्वतःच्या पद्धतीने भाजपला याचा जाब विचारतील, असा इशाराही बालवडकर यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपकडून या टीकेला काय उत्तर दिले जाते, तसेच रॅलीचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ६५ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

पुणे, दि. १० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात...

बालेवाडीत १.१ दशलक्ष चौ.फुटांचा ‘ग्रेड ए’ कमर्शियल टॉवर; डीबीएस बँकेकडून के रहेजा कॉर्पला ५२० कोटींचे वित्तसाहाय्य

‘LEED Platinum’ पूर्व-प्रमाणित प्रकल्पासाठी निधी; बालेवाडी बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये फ्युचर-रेडी...