सहायक क्रीडा अधिकारी सोनाली कदम यांच्या पदोन्नतीतील अडथळा दूर होणार; मुख्य सभेच्या मंजुरीनंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे
पुणे : पुणे महानगरपालिकेतील पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्गातील प्रशासकीय अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागातील क्रीडा अधिकारी वर्ग-२ या पदाच्या आकृतीबंधात एक अतिरिक्त जागा वाढविण्याचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी वर्ग-२ या पदावर राज्य शासनाकडून थेट नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेत सहायक क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली कदम यांच्या पदोन्नतीत अडथळा निर्माण झाला होता.
या परिस्थितीत पात्र कर्मचाऱ्याला पदोन्नतीची संधी मिळावी आणि प्रशासकीय स्तरावर निर्माण झालेला पेच दूर व्हावा, यासाठी क्रीडा अधिकारी पदाच्या मंजूर आकृतीबंधात एक जागा वाढविण्याचा मार्ग प्रशासनाने स्वीकारला आहे.
त्यासाठी सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो विधी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. विधी समितीनंतर या प्रस्तावाला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल.
राज्य शासनाने सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिल्यास क्रीडा अधिकारी वर्ग-२ पदाची एक अतिरिक्त जागा उपलब्ध होईल आणि त्यामुळे सोनाली कदम यांच्या पदोन्नतीच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पात्रता आणि सेवाज्येष्ठता असूनही आकृतीबंध अथवा मंजूर पदांच्या मर्यादेमुळे पदोन्नती रखडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे क्रीडा विभागाच्या या प्रस्तावाकडे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा निर्णय म्हणून पाहिले जात आहे.

