पोस्टशी आपला कोणताही संबंध नसतानाही आंदोलन करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण; आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या ‘गुंगी गुडिया’ या पोस्टवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांबाबत अशा प्रकारचा शब्दप्रयोग टाळता आला असता आणि सक्रिय राजकारणात असलेल्या महिला नेत्यांविषयी बोलताना राजकीय पातळी सोडणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
चव्हाण यांनी सांगितले की, दिल्लीत असताना सकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा फोन आला होता. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध झालेल्या पोस्टवर आक्षेप नोंदवला. याबाबत माहिती घेण्याचे आपण त्यांना सांगितल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
बीडमधील पत्रकार परिषदेचा संदर्भ
बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला होता. मात्र, त्या प्रश्नाला उत्तर न देता पत्रकार परिषद संपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावर ही टिप्पणी करण्यात आली होती, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
“प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर न देणे हा मंत्र्यांचा अधिकार असू शकतो. मात्र, त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अनुत्तरितच राहतो. त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची असून त्यांनी उत्तर दिले पाहिजे,” असे चव्हाण म्हणाले.
महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज
राजकारणात महिलांचे स्थान अद्याप मर्यादित असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले की, एखादी महिला सक्रिय राजकारणात काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. सुनेत्रा पवार या राज्याच्या घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत असून त्यांच्याबद्दल बोलताना भाषेची मर्यादा पाळणे आवश्यक आहे.
“काँग्रेसने नेहमीच राजकारणाची पातळी सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गुंगी गुडिया’ असा शब्दप्रयोग यापूर्वी दिवंगत समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केला होता. मात्र, इंदिरा गांधी यांनी त्याला आपल्या कृतीतून उत्तर दिले. सुनेत्रा पवार यांच्याकडूनही कृतीतून उत्तर मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी म्हटले.
‘माझा पोस्टशी कोणताही संबंध नाही’
संबंधित पोस्टशी आपला कोणताही संबंध नसतानाही आपल्या विरोधात आंदोलन करण्यात येत असल्याबद्दल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. कोणावरही आरोप किंवा आंदोलन करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी संपूर्ण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला असून राज्यातील विविध ठिकाणी प्रतिक्रिया आणि आंदोलने सुरू आहेत.

