पाच निविदांमध्ये ‘प्राप्ती एन्व्हायरो सर्व्हिसेस’ची निविदा सर्वात कमी; अंदाजित रकमेपेक्षा ३०.१५ टक्के कमी दर
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात होणाऱ्या गणेशोत्सवासह विविध उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये मोबाईल टॉयलेट पुरविणे तसेच त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदांपैकी मे. Prapti Enviro Services यांची निविदा सर्वात कमी ठरली आहे.
या कामासाठी महापालिकेने ९९ लाख ९९ हजार ७०० रुपयांचे अंदाजपत्रक निश्चित केले होते. एकूण पाच निविदा प्राप्त झाल्या असून, त्यापैकी Prapti Enviro Services यांनी अंदाजित रकमेपेक्षा ३०.१५ टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे.
त्यामुळे संबंधित कंपनीकडून ६९ लाख ८४ हजार ७९० रुपये ४५ पैसे इतक्या रकमेत मोबाईल टॉयलेट पुरविणे आणि त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
निविदेचे ‘बी’ पाकीट २५ ऑगस्ट २०२६ रोजी उघडण्यात आले होते. संबंधित कंपनीशी करारनामा करून त्याच तारखेपासून काम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
हा विषय स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेत विषय क्रमांक १२४२ म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. स्थायी समितीची बैठक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता होणार असून, या बैठकीत प्रस्तावावर निर्णय होणार आहे.

