पुणे.दि.१: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दोन्ही महापुरुषांना भावपूर्ण अभिवादन केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हा विचार देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भक्कम पाया रचला. पुण्याच्या भूमीतून त्यांनी राष्ट्रीय चळवळीला दिशा दिली. गीतारहस्यसारखा ग्रंथ तुरुंगवासात लिहित देशकार्य, धर्मकार्य आणि समाजजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याला आजही देश कृतज्ञतेने स्मरतो.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना आवाज दिला. सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाच्या लढ्यासाठी त्यांनी केलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांनाही आदरांजली वाहिली.
यावेळी लोकमान्य टिळक स्मृती कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक ट्रस्ट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा पुरस्कार हा देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा गौरव असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

