ड्रग्ज रॅकेटशी संबंध; पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे सेवेतून बडतर्फ

Date:

अवैध व्यवसायांना संरक्षण देऊन पैसे घेतल्याचा आरोप विभागीय चौकशीत सिद्ध; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई

पुणे : अमली पदार्थांच्या रॅकेटमधील आरोपींशी संबंध ठेवणे, अवैध व्यवसायांना संरक्षण देणे आणि त्याबदल्यात पैसे स्वीकारणे या आरोपांप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विभागीय चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कठोर कारवाई केली.

पोलीस दलातील भ्रष्टाचार, शिस्तभंग आणि गुन्हेगारांशी संगनमताच्या घटनांविरोधात आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वीकारलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेतील ही आणखी एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. गैरवर्तन, भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारी कृत्यांना पाठबळ देणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

स्वारगेटमध्ये नियुक्ती, सहकारनगर हद्दीत वसुली

नवनाथ शिंदेची नियुक्ती स्वारगेट पोलीस ठाण्यात असताना त्याने सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांकडून संरक्षणाच्या नावाखाली पैसे घेतल्याचे विभागीय चौकशीत समोर आले. अवैध व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संबंधितांना मदत केल्याचाही त्याच्यावर आरोप होता.

गांजा कारवाईत उघड झाले संबंध

ऑगस्ट २०२५ मध्ये सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या कारवाईत पाच किलो गांजा जप्त करून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींच्या मोबाईलची तपासणी करताना एका मोबाईलमध्ये ‘एनबी’ या नावाने एक क्रमांक सेव्ह असल्याचे आढळले. पुढील तपासात ‘एनबी’ म्हणजे ‘नवनाथ भाई’ आणि संबंधित क्रमांक पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिंदेचा असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला.

शिंदे हा अमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.

मे महिन्यातही तिघांवर कारवाई

यंदाच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी पथकातील कर्मचारी सोनाली हिंगे आणि पोलीस शिपाई सुदाम तायडे यांना सेवेतून बडतर्फ केले होते.

महाविद्यालयाच्या एका प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्यांच्यावर होता. विभागीय चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

“अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी, अवैध व्यवसायांना संरक्षण किंवा अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर सेवेतून बडतर्फीसह कठोर कारवाई केली जाईल.”

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे; अजीत डोवाल...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित  एक्स्प्रेस ट्रेन सुरु करण्यास मंजुरी

मुंबई- महाराष्ट्र आणि कोकण विभागातील प्रवासी संपर्क सुविधेला  मोठी चालना...

विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेल्या हातांनी लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास शहर काँग्रेसचा विरोध.

पुणे-   दिल्ली येथील जतंर-मंतर मध्ये झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन...