जोडरस्त्याचे काम युद्धपातळीवर; स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
पुणे, दि. ३० जुलै : खराडी आणि मुंढवा-केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या खराडी-केशवनगर पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. केशवनगरकडील सुमारे ७०० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, हे काम पूर्ण होताच पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
खराडी, मुंढवा, केशवनगर, मगरपट्टा, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी परिसरात आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी मुळा-मुठा नदीवर नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता.
महापालिकेच्या पथ विभागाने २३ कोटी २० लाख रुपयांच्या खर्चातून सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्त्वावर या पुलाचे काम हाती घेतले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पातील पुलाचे मुख्य बांधकाम आता पूर्ण झाले आहे. खराडीकडील बाजूस सिग्नलसह वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधाही उभारण्यात आल्या आहेत.
मात्र, केशवनगरकडील रेणुकामाता मंदिर परिसरातून गोदरेजकडे जाणाऱ्या सुमारे ७०० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम अद्याप सुरू असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला करता आलेला नाही. पावसाळ्यामुळे डांबरीकरणाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच या रस्त्यासाठी आवश्यक असलेली सुमारे २५० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
पुलाच्या मार्गातील रस्त्यावर असलेली सुमारे शंभर झाडे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पदपथ, संरक्षक भिंत आणि डांबरीकरणाची कामे सुरू असून, ती १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
“पुलाच्या मार्गातील रस्त्यावरील शंभर झाडे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पदपथ आणि डांबरीकरणाची कामे सुरू असून, १५ ऑगस्टपर्यंत ती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
— श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
प्रकल्प दृष्टिक्षेप
प्रकल्प खर्च : २३ कोटी २० लाख रुपये
पुलाची लांबी : २४६.४० मीटर
पुलाची रुंदी : २४ मीटर
सेवा मार्ग : दोन्ही बाजूंना प्रत्येकी १ मीटर
स्वतंत्र पदपथ : २ मीटर रुंद
दुभाजकाची रुंदी : १ मीटर

