१ ऑगस्टच्या दौऱ्यावेळी तीव्र निदर्शने करण्याचा माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा
पुणे : दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याचा आणि पॅलेट गनच्या वापराचा आदेश कोणी दिला, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी द्यावे. अन्यथा त्यांच्या पुणे भेटीला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे.
लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा हे १ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यास या दौऱ्यावेळी तीव्र निदर्शने करून विरोध नोंदविण्यात येईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर लाठीहल्ला करण्यात आला. पॅलेट गनच्या माऱ्यात अनेक जण जखमी झाले असून, एका पत्रकारालाही दुखापत झाली. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांसमोर आणल्यानंतर या कारवाईबाबत नागरिकांमध्येही तीव्र संताप निर्माण झाला असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.
देशातील शैक्षणिक व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. अशा विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे संरक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी होती. मात्र सरकारने ही जबाबदारी पार पाडण्याऐवजी पोलिसांकडून बळाचा वापर केला, असा आरोप त्यांनी केला.
दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लाठ्या चालविण्याचा आणि पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला, याचे उत्तर गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी द्यायलाच हवे. या प्रकरणाची जबाबदारी ते झटकू शकत नाहीत, असेही मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईबाबत केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जखमी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

