संचेती पुलाजवळील प्रकार; नाना पेठेतील शुभम वनितविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनाला कारने कट मारत बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नाना पेठ येथील शुभम विजय वनित (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचाही त्याच्यावर आरोप असून मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमे लावण्यात आली आहेत.
FIRमधील माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे विमानतळावरून कोथरूडकडे जात होते. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी ईश्वर लक्ष्मण भिकुले अंगरक्षक कर्तव्यावर होते.
ताफा संचेती पुलावरून पुढे जात असताना शुभम वनित हा कार चालवत होता. त्याने आपल्या ताब्यातील वाहन मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वेडीवाकडी, बेफिकीर व बेदरकारपणे चालवत मंत्री मोहोळ यांच्या वाहनाला कट मारल्याचा आरोप FIRमध्ये करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहितेचे कलम 281 तसेच मोटार वाहन कायद्याची कलमे 184, 185 आणि 119/177 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

