संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडून वीजयंत्रणेच्या कामांचा आढावा
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्याला आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तेलंगणा राज्यातून पर्यायी व्यवस्था तयार करण्यासाठी महापारेषण व महावितरणकडून वीजयंत्रणेची उभारणी वेगाने सुरू आहे. महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी रविवारी (दि. १३) या कामांची पाहणी केली व आढावा घेतला.
गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे २५० किलोमीटरवर असलेला सिरोंचा तालुका हा अत्यंत दुर्गम, ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या तालुक्याच्या पूर्वेला छत्तीसगड आणि दक्षिणेला तेलंगणा राज्य आहे. महावितरणचे या तालुक्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर असे १३ हजार ९२८ वीजग्राहक आहेत. सिरोंचा येथे महापारेषणच्या ६६/३३ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या ३३/११ केव्हीच्या पाच उपकेंद्रांना आणि तिथून संपूर्ण तालुक्याला सुमारे २२ मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो.
तथापि, महापारेषणच्या सिरोंचा ६६/३३ केव्ही उपकेंद्राला आलापल्ली येथील १३२/६६ केव्ही उपकेंद्रातून तब्बल ९३ किलोमीटर लांबीच्या ६६ केव्ही वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. जीमलगट्टाचे घनदाट जंगल, नद्या व नाल्यांमुळे पावसाळ्यात संपर्क तुटत असल्याने या वीजवाहिनीमधील बिघाड शोधणे, दुरुस्ती करणे अत्यंत जिकरीचे व खडतर आहे. या भागात संपर्काचे कोणतेही नेटवर्क नाही. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेची उपाययोजना म्हणून सिरोंचा येथून ३२ किलोमीटरवर असलेल्या तेलंगणा राज्यातील किस्तमपेठ (जि. मंचेरियल) येथून सिरोंचापर्यंत ११३ टॉवर उभारून १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीचे काम महापारेषण कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे. येत्या जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सोबतच सिरोंचा येथील महापारेषणच्या ६६/३३ केव्ही उपकेंद्रांच्या ठिकाणी १३२/६६/३३ क्षमतावाढीचे काम पूर्ण झाले आहे. या कामांची रविवारी (दि. १३) संचालक (संचालन) श्री. धनजंय औंढेकर यांनी पाहणी केली व आढावा घेतला. यासोबतच महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये आवश्यक नुतनीकरणाचे कामे सुरू आहेत. यात सिरोंचा ३३/११ केव्हीचे नवीन उपकेंद्र कार्यान्वित देखील झाले आहे. या उपकेंद्रात ५ एमव्हीएचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. तिथे ५ एमव्हीएचे आणखी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्याची सूचना संचालक श्री. औंढेकर यांनी केली. यावेळी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर व अमलेश लोणारे (महापारेषण), आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे, विलास रंगारी (महापारेषण), उपकार्यकारी अभियंता श्री. भारत बालपांडे आदींची उपस्थिती होती.
सिरोंचा तालुक्याला आलापल्ली व किस्तमपेठ (तेलंगणा) या दोन्ही ठिकाणाहून वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होणार असल्याने तालुक्यातील १४० दुर्गम व अतिदुर्गम गावांतील सुमारे ७५ हजार नागरिकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे. किस्तमपेठ (तेलंगणा) येथून सिंरोचा तालुक्यासाठी विजेची पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर सध्याच्या सिरोंचा-आलापल्ली ६६ केव्ही वीजवाहिनीची क्षमतावाढ करून ती १३२ केव्ही करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे.

