मुंबई -‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि गृहखात्यावर घणाघाती हल्ला चढवला. “हा देशभरातील तरुणाईचा आणि ‘जेनझी’चा ऐतिहासिक विजय असून, त्यांनी मस्तवाल सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना जमिनीवर आणले आहे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर, “पोलिसांच्या अत्याचारावर कारवाई झाली नाही, तर आता तरुणाईचा मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर संशय व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी आम्ही अभिजीत दीपके यांची सोशल मीडिया पोस्ट पाहिली. आंदोलन अजून मागे घेतलेले नाही. प्रधान यांनी खरोखरच राजीनामा दिला आहे की त्यांचा केवळ खातेबदल केला गेला आहे, यावर सरकारने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.”
गृहखात्यावर अन् पोलिसांवर गंभीर आरोप
“या आंदोलनादरम्यान भाजप सरकारचा अत्यंत बिभत्स आणि गुन्हेगारी चेहरा जगासमोर आला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठ्या चालवल्या गेल्या, तरुणींवर हात उचलला गेला. एका तरुणीने व्यथित होऊन तिच्या कपड्यांना हात घातल्याचे सांगितले. साध्या वेशातील गुंड तिथे घुसवले गेले होते, त्यांच्यावर आणि अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल होणार की नाही? आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार की नाही? याचे उत्तर गृहमंत्री अमित शहा यांनी दिले पाहिजे. अन्यथा, ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडून अमित शहांकडे आपला मोर्चा वळवेल,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
क्रांतीची ठिणगी विझलेली नाही—उद्धव ठाकरे म्हणाले, “जणू या देशात लोक राहतच नाहीत, सगळे झुरळ आहेत असा जो भ्रम सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, तो या तरुणांनी भुईसपाट केला आहे. देशात आधुनिक क्रांतीची ठिणगी अजून विझलेली नाही, हेच या युवाशक्तीने दाखवून दिले आहे.”
खुर्चीत बसलोय म्हणून डोक्यात माज आणू नका; सरन्यायाधीशांना टोला
आंदोलनातील घटकांचा ‘झुरळ’ असा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘यशवंत’ चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “ज्यांनी या तरुणांना ‘झुरळ’ म्हटले होते, त्यांनी हे चांगलेच लक्षात ठेवले पाहिजे की आपण केवळ उच्च पदाच्या खुर्चीत बसलोय म्हणून डोक्यात माज आल्यासारखे वागू नका. देशातील युवाशक्ती जेव्हा एकत्र येते, तेव्हा ती काय करू शकते? याची ही फक्त एक झलक आहे. एका झुरळाने हुकूमशाहाला कसे झुकवले, हे आज देशाने पाहिले.”
सरकारच्या झिंज्या उपटल्या, उद्या शिवाजी पार्कवर विजयोत्सव – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाला तरुणांचा आणि जनशक्तीचा मोठा विजय मानले. “उद्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर, वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल. तिथेच सगळे जमतील. हा या तरुणाईचा आणि अभिजित दीपके यांच्या लढ्याचा खूप मोठा विजय आहे. एका वाक्यात सांगायचे तर या ‘झेंजी’ने (Gen-Z) सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत आणि त्यांना पूर्णपणे जमिनीवर आणले आहे. मस्तवालपणे उत्तर देणाऱ्या सरकारला आज माघार घ्यावी लागली, याचा जल्लोष शिवाजी पार्कवर होईल,” असे ते म्हणाले.
हा राग प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेलाय”:
राज ठाकरे म्हणाले, “आता जनतेचा आणि तरुणांचा राग शिक्षणमंत्री प्रधानांवरून थेट पंतप्रधानांवर गेलेला आहे. यापुढे अभिजित दीपके आणि आंदोलक तरुण जो काही निर्णय घेतील, त्याला आमचा आणि संपूर्ण देशातील तरुणांचा पूर्ण पाठिंबा असेल.”
फडणवीसांना दिल्लीहून बोलावणे; राज ठाकरेंची फिरकी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याच्या चर्चेवर राज ठाकरे यांनी मिश्किल टोला लगावला. “त्यांच्यात इतकी चुरस आहे की एकनाथ शिंदे दिल्लीला गेले अन् ते आले की फडणवीस जातात आणि फडणवीस आले की शिंदे जातात! हे अनेकदा झाले आहे. आता नक्की कशासाठी बोलावले आहे, हे त्यांनी सांगितल्याशिवाय किंवा वरून निर्णय झाल्याशिवाय कळणार नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

