रसिक कलारंजन आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ कार्यक्रमास रसिकांची दाद
पुणे : ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’, ‘सर्वात्मका सर्वेश्र्वरा’ अशी गीते, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’, ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’ आदी काव्यरचना, ‘नदी बाई माय माझी’, ‘हासरा लाजरा श्रावण आला’ अशा गीतांवर सादर करण्यात आलेला नृत्याविष्कार, ‘कणा’ ‘गाभारा’ तसेच ‘लिलाव’ या काव्यांचे नाट्य रुपांतर आणि अभिवाचनातून कुसुमाग्रज उलगडत गेले.
निमित्त होते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर आधारित ‘गगनीचा अढळ तारा’ हा अभिवाचन, नाट्य, नृत्य, संगीतमय कार्यक्रमाचे. रसिक कलारंजन पुणे तर्फे भरत नाट्य मंदिराच्या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी २५ कलाकारांच्या सहभागातून हा अनोखा कार्यक्रम भरत नाट्य मंदिर येथे सादर करण्यात आला. बाल कलाकारांपासून ज्येष्ठ कलकारांनी आपल्या अभिनय कौशल्यातून रसिकांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे संहिता लेखन अंजली दफ्तरदार यांचे होते तर दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी, नृत्य दिग्दर्शन सुचित्रा मेडदकर आणि संगीत संयोजन अभिजित पाटसकर यांनी केले.
माणसाच्या मनातील गाभाऱ्यातल्या देवाला शोधणाऱ्या कुसुमाग्रजांनी विषयांच्या चौकटीत बांधता न येणारे काव्य निर्माण केले. त्यांच्या काव्य रचनांमधून वंचित समाजाविषयी असलेली कणव, त्यांचे दु:ख पाहून आलेला हताशपणा, शेतकऱ्यांच्या दुर्दशेतून मनाला झालेल्या वेदना, मायभूमीचे, मातीचे प्रेम, राष्ट्रासाठी असलेली ओढ, स्वातंत्र्यदेवीची महती अशा विविध विषयांवरील साकारलेले काव्य, नाट्य रसिकांना विशेष भावले.
अनेक थोर साहित्यिकांशी कुसुमाग्रज यांचे असलेले मैत्र, त्यांच्यातील विचारांची देवाणघेवाण तसेच नाट्यप्रसंग
विशेष दाद मिळावून गेले. कुसुमाग्रज यांनी साध्या-सोप्या, कमी जोडाक्षरे असलेल्या रचना बाल कलाकारांनी अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना आनंदीत केले.
कुटुंबात तात्या म्हणून ओळखले जाणारे कुसुमाग्रज स्वभावाने कसे मिश्किल होते, त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या, त्यांचा संवेदनशील स्वभाव कसा होता आदी वैशिष्ट्ये अंजली दफ्तरदार, अनुराधा कुलकर्णी, दिपाली निरगुडकर यांच्या प्रभावी अभिवाचनातून रसिकांसमोर उलगडली.
साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे विचार असणाऱ्या कुसुमाग्रज यांनी उत्तमोत्तम नाटकांचे लेखन केले आहे. त्यातील ‘नटसम्राट’ या सुप्रसिद्ध नाटकातील प्रसंग ज्येष्ठ कलाकार अरुण पटवर्धन यांनी ताकदीने सादर केले. ‘गर्जा जयजयकार’, ‘आवडतो मज अथांग सागर’, ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’, ‘जाता जाता गाईन मी’, ‘सर्वात्मका सर्वेश्र्वरा’ आदी गीते सादर करण्यात आली. संध्या कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य देवीची कविता ऐकवून रसिकांना स्तिमित केले. ‘पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा’ या काव्याच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद देत वन्समोअरची मागणी केली.
कधी हसायला तर कधी विचार करायला लावणाऱ्या, देशप्रेम जागृत करणाऱ्या, डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या साहित्यकृतींचे प्रभावी सादरीकरण पाहून रसिक भारावून गेले.
कार्यक्रमात शुभ्रा सातभाई, आद्या सोहनी, अवनी कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, प्रज्ञा समर्थ, धनश्री रत्नालिकर, श्वेता सोहनी, हर्षदा टिल्लू, प्रसन्न सोहनी, स्वप्नील सातभाई, श्रीशैल शेलार या कलाकारांचा सहभाग होता. तर मधुमिता देवधर, अभिजित नांदगावकर (गायन), अमोल भट (तबला), रोहित गरुड (सतार) यांची साथ लाभली.
सुरुवातीस भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी प्रमुख कलाकारांचा सन्मान केला. चारुलता पाटणकर यांनी भरत नाट्य मंदिराच्या सांस्कृतिक उपक्रमांची तर बिपिन दफ्तरदार यांनी रसिक कलारंजन संस्थेविषयी माहिती सांगितली.

