- पेठ क्रमांक १२ व ३०-३२ मधील १,०२९ सदनिकांच्या सोडतीनंतर पुढील कार्यवाही सुरू!
- ४,२६३ अर्जदारांना १५ दिवसांत मिळणार अनामत रकमेचा परतावा!
- ‘पीएमआरडीए’ गृहयोजना अंतिम टप्प्यात; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच संधी!
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ मधील शिल्लक १,०२९ सदनिकांसाठी काढलेल्या गृहयोजनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या सोडतीतील सदनिका नाकारलेल्या व सोडतीत अयशस्वी ठरलेल्या एकूण ४,२६३ अर्जदारांची अनामत रक्कम पुढील १५ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आली आहे. दरम्यान, ३९९ विजेत्यांनी सदनिका स्वीकारल्या असून, ज्या लाभार्थ्यांनी सदनिका नाकारल्या आहेत, त्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील (Waiting List) अर्जदारांना लवकरच संधी देण्यात येणार आहे.
‘पीएमआरडीए’ने ८ एप्रिल २०२६ रोजी या १,०२९ सदनिकांची सोडत जाहीर केली होती. यामध्ये ८७१ लाभार्थी पात्र ठरले होते. या लाभार्थ्यांना सदनिका स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी सुरुवातीला ११ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी कोणताही पर्याय निवडला नसल्याने जमीन व मालमत्ता विभागाने ही मुदत २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवली होती. एकूण ८७१ विजेत्यांपैकी ३९९ लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारल्या आहेत.
दरम्यान, ‘पीएमआरडीए’ने पारदर्शकतेवर भर देत परताव्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. जे अर्जदार सोडतीत अयशस्वी ठरले आहेत किंवा ज्यांनी सदनिका नाकारली आहे, अशा अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा दिला जाणार आहे :
एकूण अर्जदार : ५,३१७
सोडतीत यशस्वी अर्जदार : ८७१
प्रतीक्षा यादीतील अर्जदार : ६५५
सदनिका नाकारणारे अर्जदार : ४७२
सदनिका स्वीकारणारे अर्जदार : ३९९
या सर्व अर्जदारांच्या अर्जासोबत जोडलेल्या बँक खात्यांमध्ये १५ दिवसांच्याआत अनामत रक्कम जमा केली जाईल, असे ‘पीएमआरडीए’ने स्पष्ट केले आहे. ज्या लाभार्थ्यांनी सदनिका नाकारल्या आहेत, त्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील (Waiting List) अर्जदारांना संधी दिली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया सर्व ४,२६३ अर्जदारांना त्यांची अनामत रक्कम परत केल्यानंतरच सुरू केली जाईल. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच स्वप्नातील घर साकारण्याची संधी मिळणार आहे.
“सोडतीमधील पारदर्शकता आणि लाभार्थ्यांची सोय लक्षात घेऊन आम्ही अनामत रकमेची परतावा प्रक्रिया तातडीने राबवत आहोत. १५ दिवसांत पैसे संबंधितांच्या खात्यात जमा होतील. तसेच, प्रतीक्षा यादीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.”

