पुणे ग्रँड सायकल टूरच्या खर्चावर प्रश्नचिन्ह; रस्त्यांच्या कामांचा तपशील जाहीर करण्याची मागणी

Date:

१६७ कोटींच्या प्रस्तावित खर्चासह मार्ग, सरफेसिंग आणि मागील कामांच्या देयकांबाबत उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी व प्रशांत बधे यांचे महापालिकेला दहा प्रश्न

पुणे, दि. १७ जुलै : पुणे ग्रँड सायकल टूरसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या खर्चासह स्पर्धेचा मार्ग, रस्त्यांचे सरफेसिंग, पदपथ दुरुस्ती, उंचावलेले पादचारी क्रॉसिंग आणि मॅनहोलच्या कामांबाबत माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी पुणे महापालिका प्रशासनाला दहा प्रश्न विचारले आहेत. संबंधित सर्व कागदपत्रे आणि इस्टिमेट कमिटीने मंजूर केलेले अंदाजपत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

महापालिकेचे प्रभारी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर यांना दिलेल्या पत्रात पुणे ग्रँड सायकल टूरसाठी महापालिका सुमारे १६७ कोटी रुपये खर्च करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्पर्धा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या रस्त्यांच्या सरफेसिंग आणि दुरुस्तीसाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे नमूद करत, स्पर्धेचा अधिकृत मार्ग महापालिकेला प्राप्त झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मार्ग निश्चित झाला असल्यास त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रात सायकल टूरचा मार्ग सुमारे १३५ ते १३७ किलोमीटर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मार्गातील कोणते रस्ते मागील वर्षीही स्पर्धेसाठी वापरण्यात आले होते आणि त्याच रस्त्यांवर पुन्हा सरफेसिंग करण्याची आवश्यकता का निर्माण झाली, याची तपासणी झाली आहे का, असा सवाल करण्यात आला आहे.

मागील वर्षी रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी निकृष्ट काम केले असल्यास नव्याने होणारी दुरुस्ती त्यांच्या ‘डिफेक्ट लायबिलिटी’ कालावधीत करता येईल का, याची तपासणी करावी. करदात्यांच्या पैशातून एकाच कामासाठी वारंवार खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

प्रायोजकाच्या नावापेक्षा पुण्याचे नाव मोठे असावे

स्पर्धेच्या नावात प्रायोजकाचे नाव पुण्याच्या नावापेक्षा अधिक ठळक केले जाऊ नये, अशी भूमिकाही पत्रातून मांडण्यात आली आहे. ‘पुणे–प्रायोजकाचे नाव–ग्रँड सायकल टूर’ अशा स्वरूपात स्पर्धेचे नामकरण करण्याचा आग्रह महापालिकेने धरावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील स्पर्धेत प्रायोजकाचे नाव ‘पुणे’ या नावापेक्षा मोठे दिसत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

महापालिकेने रस्ते देखभाल आणि दुरुस्तीसाठी अलीकडेच १०० कोटी रुपयांची तरतूद केली असताना पुन्हा ५२ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद कशासाठी केली जात आहे, असा प्रश्न तिघांनी उपस्थित केला आहे. ग्रँड सायकल टूरशी संबंधित कामे आधीच्या १०० कोटी रुपयांच्या तरतुदीतून होऊ शकत नाहीत का, याचे प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

महापालिकेकडे स्वतःचा डांबर प्लांट आणि रस्त्यांचे सरफेसिंग करण्यासाठी आवश्यक यंत्रणा असताना या कामासाठी स्वतंत्र ठेकेदाराची आवश्यकता काय, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पदपथ, क्रॉसिंग आणि १,६२० मॅनहोलबाबत प्रश्न

स्पर्धेचा मार्ग १३५ किलोमीटरचा असल्यास केवळ १३ किलोमीटर पदपथांची सुधारणा करण्याचे नियोजन कोणत्या निकषांवर करण्यात आले, असा प्रश्न पत्रात विचारण्यात आला आहे. आठ किलोमीटर लांबीच्या उंचावलेल्या पादचारी क्रॉसिंगची दुरुस्ती नेमकी कशा प्रकारे केली जाणार, याची माहितीही मागण्यात आली आहे.

या मार्गावर सुमारे १,६२० मॅनहोल असल्याचा उल्लेख करत, ते रस्त्याच्या पातळीशी समांतर करण्याचे काम यापूर्वी क्षेत्रीय कार्यालये किंवा मुख्य कार्यालयाने का केले नाही, असा सवाल करण्यात आला आहे. सणस मैदान परिसरात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत किती मॅनहोल रस्त्याच्या पातळीशी समांतर करण्यात आले आणि त्यामध्ये या प्रस्तावित मार्गावरील किती मॅनहोलचा समावेश होता, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या कामांची चौकशी करा

मागील वर्षीच्या ग्रँड सायकल टूरसाठी करण्यात आलेली सर्व कामे, त्यासाठी मंजूर करण्यात आलेली अंदाजपत्रके आणि ठेकेदारांना अदा केलेली रक्कम तातडीने जाहीर करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

मागील वर्षी काही अंदाजपत्रकीय बाबींवर महापालिका आयुक्तांकडे आक्षेप नोंदविण्यात आले होते. अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेली काही कामे प्रत्यक्ष जागेवर करणे शक्य नसतानाही त्यांची देयके अदा करण्यात आली आहेत का, याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

निविदा न काढता महापालिका अधिनियमातील कलम ५(२)(२) अंतर्गत करण्यात आलेल्या पदपथ दुरुस्ती आणि नवीन पदपथांच्या कामांमधील रस्ते व ग्रँड सायकल टूरच्या मार्गावरील रस्ते एकच आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“पुण्याचे नाव जगभर व्हावे आणि बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना उत्तम रस्ते मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र पुण्यात राहणाऱ्या आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही वर्षभर चांगले रस्ते मिळाले पाहिजेत,” अशी भूमिका केसकर, कुलकर्णी आणि बधे यांनी मांडली आहे.

या संदर्भातील मार्गनकाशा, मंजूर अंदाजपत्रके, इस्टिमेट कमिटीची मान्यता, मागील वर्षीच्या कामांचा तपशील आणि अदा करण्यात आलेली रक्कम महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्राची प्रत अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि नगर अभियंता यांनाही देण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रत्येक मतदाराने SIR गणना पत्र वेळेत भरुन लोकशाही बळकट करावी!

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे...

घनकचरा विभागाचे नाव ‘भूमिग्रीन घनकचरा व्यवस्थापन विभाग’ करा!

पुणे महापालिकेच्या नाव समितीसमोर उपरोधिक प्रस्ताव; प्रशासन आणि कंपनीच्या...

‘भूमी ग्रीन’ला अवास्तव दराने काम देण्याचा घाट,ओला-सुका कचरा प्रकल्पाची निविदा तात्काळ रद्द करा- ॲड. निलेश निकम

निविदा प्रक्रियेत स्पर्धा रोखण्यासाठी अटी घातल्याचा आरोप पुणे, दि. १७...