व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून ग्राहकांशी संपर्क
पुणे, दि. १७ जुलै : कात्रज परिसरातील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या परराज्यातील दोन तरुणींची भारती विद्यापीठ पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या प्रकरणी एका दलालाला अटक करण्यात आली असून त्याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील एका लॉजमध्ये काही व्यक्ती ग्राहकांच्या मोबाइलवर व्हॉट्सॲपद्वारे महिलांचे फोटो पाठवत होते. त्यानंतर महिलांची निवड करण्यास सांगून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकांच्या माध्यमातून संशयित दलालाशी संपर्क साधण्यात आला. दलालाने संबंधित ग्राहकांना कात्रजमधील किनारा लॉज येथे येण्यास सांगितले.
बनावट ग्राहकांकडून ठरलेला इशारा मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला. लॉजमधील एका खोलीतून परराज्यातील दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी तुकाराम दत्ता मनाळे (वय २२, सध्या रा. तीनहत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी; मूळ रा. सरवडी, ता. निलंगा, जि. लातूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह अन्य दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

