स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषद ११ सप्टेंबर रोजी पार पडणार
पुणे-स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक धर्माच्या संसदेत ऐतिहासिक भाषण केले होते. याचं दिवसाचे महत्त्व लक्षात घेवून जांबवंत फाऊंडेशनच्या वतीने स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही एकेदिवशीय परिषद ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण पुणे या ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गौरव त्रिपाठी, प्रतिभा त्रिपाठी आणि रोहित आरोटे यांनी दिली. ११ सप्टेंबर रोजी शेकडो लोक स्वामी विवेकानंदांच्या पोशाखात येवून स्वामीं विवेकानंदांनी केलेल्या भाषणाचे वाचन करणार आहेत, यातून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वामी विवेकानंदांची शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे त्यांचे मत यावर चर्चासत्र होणार आहे.
या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे, लेखक आणि वक्ते दिनेश घोडके, लेखक आणि शास्त्रज्ञ आनंद रंगनाथन, लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील अश्विनी उपाध्याय, भाजपाचे दिल्ली प्रदेशचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा हे असणार असून संयोजक ओंकारेश्वर मंदिराचे विश्वस्त डी. व्ही लोणकर, उद्योजक मनोज पोचट, गिरीश कुलकर्णी, राजेश पाटील, मनोज बेहेडे, जांबवंता फाउंडेशन आणि सह-संस्थापक आणि ग्रुप सिटिओ, इनोप्लेक्सस कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे गौरव त्रिपाठी, जांबवंत फाउंडेशनच्या संस्थापक श्रीमती प्रतिभा त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारत देश हा अनेक संत आणि महापुरुषांनी बनलेला आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला कित्येक पिढ्या प्रेरणा देत आले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपल्याला एक सकारात्मक संदेश मिळत असतो. संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य खचून जातो, निराश होतो. तेव्हा आपण त्यांचे विचार वाचतो आणि त्यामुळे पु्हा एकदा लढण्याचे बळ मिळते. अमेरिकेतील शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक धर्माच्या संसदेत ऐतिहासिक भाषण दिले, ज्याने पाश्चात्य जगाला हिंदू धर्म आणि भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली. त्यांनी धार्मिक सहिष्णुता, सार्वभौमिक स्वीकृती आणि सर्व धर्म समान सत्याकडे नेणारे विचार यावर जोर दिला होता. सदरील परिषद ही सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीतजास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जांबवंत फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.