थकबाकीदारांना ३० दिवसांत अंतिम नोटिसा; जाणीवपूर्वक भाडे थकविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश
पुणे, दि. ३ ऑगस्ट : पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांवरील ३५ कोटी रुपयांहून अधिक थकीत भाड्याची प्रभावी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले. महसूलवाढ समितीच्या बैठकीत महापालिकेच्या मालमत्ता आणि त्यावरील थकबाकीचा आढावा घेण्यात आला.
महापालिकेच्या मालकीच्या १ हजार ९३२ सदनिका, २६३ इमारती आणि १ हजार ५५२ मोकळ्या जागा आहेत. यापैकी २ हजार ४०७ मालमत्तांवर तब्बल ३५ कोटी ४४ लाख २८ हजार ६९० रुपयांची भाडे थकबाकी असल्याचे बैठकीत समोर आले. सर्वाधिक थकबाकी मोकळ्या जागांच्या भाड्याची असून, त्यानंतर सदनिका आणि इमारतींच्या भाड्याचा समावेश आहे.
सर्व थकबाकीदारांना ३० दिवसांच्या आत अंतिम नोटिसा बजावण्यात याव्यात. जाणीवपूर्वक भाडे थकविणाऱ्या भाडेकरूंविरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई तातडीने सुरू करावी, असे निर्देश भिमाले यांनी दिले.
महापालिकेच्या मालमत्तांमधून मिळणारा महसूल शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे थकीत भाड्याच्या वसुलीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. नियमित भाडे भरणाऱ्या भाडेकरूंवर अन्याय होणार नाही, याचीही प्रशासनाने काळजी घ्यावी, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सर्व मालमत्तांचे डिजिटल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक मालमत्तेची थकबाकी, भाडेकरार आणि प्रत्यक्ष वापराची तपासणी करण्यात यावी. बाजारभावानुसार करारांचे पुनर्मूल्यांकन करून आवश्यक तेथे सुधारित करार करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली.
अनेक वर्षांपासून प्रभावी वसुली न झाल्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे बैठकीतील आढाव्यात स्पष्ट झाले. विशेष वसुली मोहीम, डिजिटल ऑडिट आणि करारांचे पुनर्मूल्यांकन यामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

